

नाशिक (Nashik) : मुंबई-आग्रा (Nashik - Agra) महामार्गावरील नाशिक - मुंबई (Mumbai - Nashik) दरम्यानचा रस्ता ६ नोव्हेंबरपर्यंत संपूर्णपणे खड्डेमुक्त करण्यात येईल, असे नवे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (NHAI) अधिकाऱ्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दिले आहे. तसेच तो पर्यंत आंदोलन करू नये, अशी विनंती प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी केली आहे. त्यानुसार छगन भुजबळ यांचे १ नोव्हेंबरला होणारे आंदोलन ६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान महामार्गाची पाहणी केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी पाहणी ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १ नोव्हेंबर पासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. तसेच दैनंदिन झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. तसेच आज पदाधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत कामाचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे, पिक इन्फ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात पाहणीनंतर कामास सुरुवात करण्यात आली. परंतु पुन्हा पाऊस आणि दिवाळीच्या सुट्टीमुळे कामगार नसल्याने, तसेच डांबर प्रकल्प बंद असल्याने काम करता आले नाही. दिवाळीनंतर पुन्हा काम सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास पाच ते सहा दिवस लागतील. त्यानुसार ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई - नाशिक रस्ता पूर्ण खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले. बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांनी मागितलेल्या वेळत काम न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली.
टोल नाक्यावरील अनुचित प्रकार रोखा
टोल नाक्यांवर वसुली करत असताना टोलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अरेरावी करण्यात येत आहे. यातून अनेक वाद होत आहे. वारंवार होत असलेल्या या अनुचित प्रकारांना तातडीने आळा घालण्यात येऊन सबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात, असे छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार यापुढे होणार नाही याबाबत आवश्यक ती कार्यवाही करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
टोल नाक्यावर पाच मिनीटांपेक्षा अधिक वेळ नको
टोल नाक्यावर टोल वसुली करताना वाहनांच्या रांगा लागत असून, नागरिकांना अनेक वेळ ताटकळत रहावे लागत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कार्यवाही करत टोल चालकांना सूचना कराव्यात. तसेच पाच मिनिटांहून अधिक वेळ वाहनांच्या रांगा लागल्यास तात्काळ वाहने सोडण्यात यावी अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावर टोल चालकांना याबाबत पत्रक काढून सूचना देण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई - नाशिक महामार्गावर नाशिक ते इगतपुरी दरम्यान खड्यांमुळे आतापर्यंत १० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या कुटुंबियांना NHAIच्या वतीने मदत देण्यात यावी अशी सूचना छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. याबाबत सदर नागरिकांची माहिती घेऊन शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.