Nashik: आधीच्याच स्मार्ट गावांना ZP पुन्हा करणार स्मार्ट व्हिलेज

Dada Bhuse
Dada BhuseTendernama

नाशिक (Nashik) : पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्ह्यात १०० मॉडेल स्कूल सुरू करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. त्यानंतर आता प्रत्येक तालुक्यातून तीन याप्रमाणे ४५ गावे स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला असून, त्या गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र, ही गावे निवडताना यापूर्वी आर.आर. पाटील पुरस्कारप्राप्त गावांचाच समावेश केला आहे.

विशेष म्हणजे आर.आर. पाटील आदर्श ग्राम योजनेचेच नाव २०१९ पूर्वी स्मार्ट व्हिलेज असेच होते. त्यामुळे आधीच स्मार्ट असलेल्या गावांना पुन्हा स्मार्ट व्हिलेज योजनेत समावेश करून जिल्हा परिषदेला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद यंत्रणेला ग्रामविकासाच्या योजना राबवण्यात खरोखर रस असता, तर योजना राबवण्यात सर्वांत मागे असणाऱ्या गावांची निवड केली असती, असे बोलले जात आहे.

Dada Bhuse
Nashik : अनेक वर्षे प्रलंबित सटाणा बायपाससाठी अखेर 135 कोटी मंजूर

जिल्हा परिषदेने नुकतेच पाच वर्षे प्रलंबित असलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण केले. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना स्पष्ट केली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्मार्ट व्हिलेज योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाने प्रत्येक तालुक्यातून तीन याप्रमाणे जिल्ह्यात ४५ गावे स्मार्ट करण्याचा प्रस्ताव मांडला.

या गावांची निवड करताना आधीच पुरस्कार मिळालेल्या गावांमध्ये आणखी योजना राबवून ती गावे अधिक स्मार्ट करण्याचा निर्णय झाला. यापूर्वी संत गाडगे महाराज आदर्श ग्राम योजना, केंद्र सरकारची आदर्श ग्राम योजना वा आर.आर. पाटील आदर्श ग्राम योजनेतील पुरस्कार प्राप्त गावांमधीलच गावे निवडण्यावर प्रशासनाचे एकमत झाले. त्यात आर. आर. पाटील आदर्श ग्राम योजनेतून पुरस्कार मिळालेल्या गावांची निवड करण्यावर एकमत झाले. या गावांमध्ये लोकसहभाग चांगला असून तेथील सरपंच, ग्रामसेवक सहकार्य करणारे असल्याने नवीन संकल्पनांची अंमलबजावणी सोपे जाईल, असा प्रशासनाचा त्यामागे हेतु असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Dada Bhuse
Good News : नागपूर महापालिकेत बंपर भरती; तब्बल 'एवढ्या' जागांसाठी

मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी या निवड केलेल्या गावांमध्ये ३६ योजनांची अंमलबजावणी किती प्रमाणात होत आहे, त्यानुसार गुण देऊन त्यांना स्मार्ट व्हिलेज करणार व त्या गुणांच्या प्रमाणात कमतरता असल्यास त्यांच्याकडून त्या योजनांची पूर्ण अंमलबजावणी करून घ्यायची, असे धोरण ठरवले आहे. त्यानुसार सरकारच्या ३६ योजनांची अंमलबजावणी त्या गावांमध्ये केली जाणार आहे.

या ३६ योजनांमध्ये घरकूल, शौचालय, ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडी, स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने, गाव समूह कार्यालय, गावातील इतर सार्वजनिक इमारती, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक नळजोडणीद्वारे शुद्ध पाणी, शंभर टक्के भूमिगत बंदिस्त गटारी, ओला - सुका कचरा विलगीकरण, जल जीवन मिशन, पंधरावा वित्त आयोग, रोजगार हमी योजना, क्रिडांगण,सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा, ग्रामपंचायत शंभर टक्के संगणकीकरण, अतिक्रमण मुक्त, सार्वजनिक विहीरी, वैयक्तिक विहिरी, पांदण रस्ते, जलसंधारणासाठी सिमेंट बंधारे, वृक्षलागवड, शाळा, अंगणवाडी  यांना संरक्षक भिंती, प्रत्येक घरी गुरे तिथे गोठा, स्मशानभूमी बांधकाम, गावाचा जल आराखडा, वृक्ष लागवड आदी ३६ योजनांची अंमलबजावणी या गावांमध्ये केली जाणार आहे.

Dada Bhuse
2 हजार कोटी खर्चाच्या 'मुंबई आय'साठी MMRDAचे टेंडर

योजनेची संकल्पना चांगली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करताना आधीच चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींवर अधिक लक्ष देऊन तेथील नागरिकांनाच अधिकाधिक योजनांची लाभ देण्यामागचा हेतू स्पष्ट होत नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे या योजनेतून जिल्हा परिषद प्रशासनाला सरकारला सादरीकरण करण्यासाठी आणखी एक चांगली योजना मिळेल, पण त्यातून विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या गावांकडे दुर्लक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे.

मंत्री व प्रशासकांची योजना असल्यामुळे ग्रामपंचायत, आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, महिला व बालविकासचे कर्मचारी-अधिकारी याच गावांकडे अधिक लक्ष देतील. याच गावांमधील योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, यामुळे इतर गावांमधील योजनांची अंमलबजावणी आपोआप मागे पडेल, असे बोलले जात आहे.

या योजनेतून सर्वात मागास असलेल्या गावांचा समावेश करून तेथे योजनेची अंमलबजावणी करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनाने स्वीकारले, तर काम केल्याचे समाधान प्रशासनाला व ग्रामीण नागरिकांनाही मिळू शकेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Dada Bhuse
Vadodara-JNPT मार्ग प्रगतीपथावर; बेंडशीळ गावाजवळ 4.5 किमी बोगदा

स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झालेली गावे

नाशिक : दरी, मुंगसरे, कोटमगाव
इगतपुरी : शिरसाठे, मोडाळे, नागोसली
त्र्यंबकेश्वर : वेळुंजे, काचुर्ली, आंबोली
पेठ : कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ
सुरगाणा : बुबळी, हातरुंडी, म्हैस खडक
दिंडोरी:  करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव
कळवण : सुळे, नांदुरी, मेहदर
बागलाण: पिंपळदरे, रातीर, नवे निरपुर
देवळा : वरवंडी, खालप, माळवाडी
चांदवड: राजदेरवाडी, हिरापुर, नन्हावे
मालेगाव: निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे
नांदगाव :बोराळे, श्रीरामनगर, भालुर
येवला : महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु
निफाड : थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग
सिन्नर : वडांगळी, चिंचोली, दातली

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com