

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा काळात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी विविध विभागांनी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या ४२६ कोटी रुपयांच्या प्रस्तावांपैकी २६४ कोटी रुपयांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी हे प्रस्ताव मंजूर केले आहेत. (Simhastha Kumbh Mela Nashik News)
नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका व जिल्हा प्रशासनाचा आपत्ती निवारण विभाग, जिल्हा पोलिस, नाशिक पोलिस आयुक्तालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कामांचे व वस्तू खरेदीचे प्रस्ताव दाखल केले होते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रस्तावांची छाननी केली.
या वस्तूंच्या खरेदीला मान्यता
नाशिक महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सादर केलेल्या प्रस्तावांपैकी जिल्हाधिकारी यांनी वॉटर टेंडर, रेस्क्यू व्हॅन, रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेईकल, वॉटर बोझर, फायर बाईक्स, ६० मीटर उंचीचा वॉटर टॉवर, इन्फ्लेटेबल रबर बोट, हाय-प्रेशर पंप, फ्लोटिंग पंप, कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीम, फायर-फाइटिंग रोबोट, लाइफ जॅकेट, लाइफ बॉईक, शिड्या, तंबू, आपत्कालीन दिवे, सर्च लाईट, वायरलेस सेट आदी उपकरणे खरेदीसाठी पात्र ठरवले आहेत.
आरोग्य विभागाच्या प्रस्तावांमध्ये शस्त्रक्रिया गृह (ओटी) व अतिदक्षता विभाग (आयसीयू) अद्ययावत करणे, वैद्यकीय उपकरणांची खरेदी, औषधे व डिस्पोजेबल साहित्य, पेपरलेस ओपीडी प्रणाली, रुग्णवाहिका, मेडिकल कॅम्प व तात्पुरते दवाखाने, वॉकी-टॉकी, ट्रॅकिंग प्रणाली, जीपीएस युनिटस आदी घटक पात्र ठरवण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक (ग्रामीण) अंतर्गत वायरलेस, बीडीडीएस, आपत्कालीन व्यवस्थापन आणि क्विक रिस्पॉन्स टीमसाठी सादर केलेल्या आवश्यकतांमध्ये डिजिटल वायरलेस सेट, रिपीटर्स, अँटेना प्रणाली, बॅटरी, चार्जर्स, पीए सिस्टीम, जनरेटर्स, यूपीएस, नाईट व्हिजन उपकरणे, थर्मल कटर, ड्रोन, फर्स्ट एड किट, शोध दिवे, तंबू, रेस्क्यू उपकरणे, स्लिदरींग व रॅपलिंग साहित्य आदी अनेक बाबींचे प्रस्ताव पात्र ठरवले आहेत.
सिंहस्थ काळात पोलिसांकडून इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नियंत्रण कक्षाचे बांधकाम व अंतर्गत संरचना, व्हिडिओ वॉल, सर्व्हर, स्टोरेज, कमांड अँड कंट्रोल सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, ऍनालिटिक्स साधने, आयपी कॅमेरे, एचव्हीएसी प्रणाली, फायर सप्रेशन, केबलिंग, नेटवर्क स्विचेस, प्रशिक्षण व मनुष्यबळ आदी घटकांना मान्यता देण्यात आली आहे.
मोटर ट्रान्सपोर्ट विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी डायल ११२ वाहने, रॅपिड इंटरव्हेन्शन वाहने, वॉटर टँकर, तसेच रबर बोट्स व त्यांचे पूरक साहित्य खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे लाईफ सेफ्टी उपकरणे, फायर फायटिंग साहित्य, इन्फ्लेटेबल रेस्क्यू साधने, क्राउड मॅनेजमेंट सिस्टम, सिम्युलेशन व्यायाम, मॉक ड्रिल्स व इंसिडेंट रिस्पॉन्स साधने या खरेदीस मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रस्तावांमध्ये बहु-एजन्सी प्रशिक्षण, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, रॅपिड इंटरव्हेन्शन वाहने, रेस्क्यू रोप, पंप, जनरेटर, ड्रोन, थ्रो बॅग, स्ट्रेचर, लाईफ जॅकेट, जनजागृती मोहीम, लाईटनिंग अरेस्टर प्रणाली, उपग्रह फोन रिचार्ज व सीसीटीव्ही फीड्स आदी खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. घटकांना पात्रता देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात आणखी खरेदी
छाननीनंतर जिल्हा प्रशासनाने 8 डिसेंबर 2025 रोजी स्थाननिहाय गॅप-ऍनालिसिस कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेनंतर कोणतेही शिल्लक किंवा आवश्यक घटक असल्यास ते पंधरा दिवसांत दुसऱ्या टप्प्यात खरेदीसाठी प्रस्तावित केले जातील.