
नाशिक (Nashik) : नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela)) पार्श्वभूमीवर पंचवटी येथे ३०० खाटांच्या रुग्णालयासाठी २३२ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करीत महापालिकेने राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवला आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पंचवटी व सिडको येथे प्रत्येकी १०० खाटांची दोन रुग्णालये उभारण्याची घोषणा करीत महापालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी थेट राज्याच्या आरोग्य खात्याकडे प्रस्ताव पाठवून मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मजुरीसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.
नाशिक शहरात पालिकेची चार मोठी रुग्णालये आहेत. त्यात पंचवटीत ५० खाटांचे इंदिरा गांधी रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या केवळ जनरल ओपीडी, स्त्री मेडीकल व प्रसूती शस्त्रक्रिया, बालरुग्ण विभाग, लसीकरण केले जाते. त्यामुळे पंचवटी विभागातील अर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचार घेण्यात अडचणी येत आहेत. पंचवटी भागात मळे परिसर मोठा असून मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव आदी भागात गोरगरीब व कष्टकरी वर्गांची संख्याही मोठी आहे.
दुसरी बाब म्हणजे, पंचवटीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक येत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना झटपट उपचार देण्यासाठी मोठे रुग्णालय नाही. इंदिरा गांधी रुग्णालयाची इमारत जुनी असल्यामुळे येथेही आपत्कालीन उपचार देणे शक्य नाही, ही बाब लक्षात घेत आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड येथे पालिकेच्या जागेवर रुग्णालय उभारणीचा व त्याचप्रमाणे आमदार सीमा हिरे यांनी सिडकोत प्रत्येकी १०० खाटांच्या रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पालकमंत्र्याच्या सूचनेनंतर पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वैद्यकीय विभाग व नगररचना विभागाला जागा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
वैद्यकीय विभागाने जागेची पाहणी केली असून रुग्णालय उभारायचे ठरले तर कशा पद्धतीने निधी व स्टाफ रचना असेल याबाबत आराखडा तयार केला. दरम्यान पंचवटीचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आमदार राहुल ढिकले यांनी महापालिकेस ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभागाने त्यानुसार आराखडा तयार केला आहे. तसेच हा आराखडा राज्य सरकारकडे पाठवला आहे. या रुग्णालयामुळे पंचवटीसह लगतच्या भागातील नागरिकांना जिल्हा रुग्णालय वा पालिकेच्या इतर रुग्णालयावर अवलंबून न राहता जवळच आरोग्य सुविधा मिळणार आहेत.
पंचवटीतील लोकसंख्या साधारण ८लाख असल्याचे गृहित धरून 300 खाटांचे रुग्णालय प्रस्तावित केले आहे. या रुग्णालयासाठी मालेगाव स्टॅण्ड येथील अग्निशामन विभागालगतची १४९९४ चौरसमीटर जागा उपलब्ध करून दिली आणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालयात गत तीन वर्षात बाह्य विभागात येणाऱ्यांची संख्या ३३१०९ वरून ६१९२० झाल्यामुळे तेथे ३०० खाटांच्या रुग्णालयाची गरज असल्याचे महापालिकेने सादर केले आहे. हे रुग्णालय झाल्यानंतर पंचवटीतील नागरिकांना स्वस्तात व चांगले उपचार मिळू शकणार आहेे.