
नाशिक (Nashik) : आर्थिक वर्ष संपण्यात आता मोजके दिवस उरले असतानाही जिल्ह्यातील १७ आमदारांन प्राप्त झालेल्या ८५ कोटींच्या स्थानिक विकास निधीतून आतापर्यंत ८७ टक्के कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. अद्यापही ११ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे बाकी आहे. जिल्ह्यात आमदार किशोर दराडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आमदार दिलीप बोरसे स्थानिक विकास निधीतून कामे मंजूर करण्यात आघाडीवर असून, भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी आतापर्यंत केवळ २.७५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देऊन सर्वांत तळाशी १७ व्या क्रमांकावर आहेत.
नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे १५ आमदार असून स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघातून प्रत्येकी एक असे १७ आमदार आहेत. आमदारांना दरवर्षी स्थानिक विकास निधी म्हणून पाच कोटी रुपये दिले जाते. आमदारांनी या निधीचे नियोजन करून त्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांना कळवायची असते. त्यानंतर जिल्हाधिकारी या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन आमदारांनी सूचवलेल्या यंत्रणेमार्फत त्यांची अंमलबजावणी करून घेतली जाते.
या वर्षी जिल्हातील १७ आमदारांना ८५ कोटी रुपये स्थानिक विकास निधी मंजूर झालेला आहे. या निधीचे नियोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत यादी देणे आवश्यक असताना आतापर्यंत आमदारांनी ८५ कोटींच्या कामांपैकी ७४ कोटींच्या कामांचे नियोजन करून जिल्हाधिकारी कार्यालयास यादी दिली आहे.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देऊन संबंधित अंमलबजावणी यंत्रणेस वर्ग केलेल्या निधीच्या यादीनुसार नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था आमदार नरेंद्र दराडे यांच्या ६.८९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्या खालोखाल दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी ५.९० कोटी व बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी ५.८९ कोटींच्या कामांचे नियोजन केले आहे.
त्याखालोखाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ५.४५ कोटी व शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी ५.२२ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करून पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळवले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या यादीनुसार आतापर्यंत ४.१८ कोटी रुपयांची कामे मंजूर झालेली आहेत.
शहरी भागातील आमदार पिछाडीवर
नाशिक महापालिका हद्द व नाशिक तालुका या भागातून चार आमदार निवडून दिले जातात. त्यात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्य या मतदार संघातून अनुक्रमे ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे हे भाजपचे आमदार प्रतिनिधित्व करतात. तसेच नाशिकरोड-देवळाली या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज अहिरे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे मालेगाव महापालिका हद्दीतील मालेगाव मध्य या मतदारसंघातून एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक प्रतिनिधित्व करतात.
नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी केवळ २.७५ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन केले आहे. त्यांच्यानंतर निधी खर्चामध्ये आमदार सीमा हिरे (३ कोटी), आमदार सरोज अहिरे (३.५० कोटी रुपये) व आमदार देवयानी फरांदे (३.७२ कोटी रुपये) यांनी निधी नियोजन केले आहे.
आमदार सरोज अहिरे यांनी ३.५० कोटी रुपये व आमदार मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी ३.५३ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करून जिल्हाधिकारी कार्यालयास कळवले आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने कामे मंजूर केले आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील आमदार निधी नियोजन व खर्चामध्ये पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
आमदारांनी मंजूर केलेला निधी
आमदार निधी खर्च (कोटी रुपयेमध्ये)
नितीन पवार ३.९२
दिलीप बोरसे ५.८९
नरहरी झिरवाळ ५.९०
हिरामन खोसकर ३.८३
सुहास कांदे ४.७१
मो. इस्माईल ३.५३
दादा भुसे ४.१८
डॉ. राहुल आहेर ३.७६
छगन भुजबळ ५.४५
दिलीप बनकर ४.०५
माणिकराव कोकाटे ३.६४
रांहुल ढिकले ३.७५
देवयानी फरांदे ३.७२
सीमा हिरे ३.००
सरोज अहिरे ३.५०
नरेंद्र दराडे ५.२२
किशोर दराडे ६.८९