Nashik: विरोध वाढल्याने नाशिक महापालिकेकडून 'ती' दरवाढ मागे
नाशिक (Nashik) : महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी रस्ते खोदाई (रोड डॅमेज) शुल्कात केलेल्या वाढीला राजकीय विरोध झाल्यानंतर प्रशासनाने दोन पावले माघार घेत पाणीपुरवठा, वीजजोडणी, तसेच मलनिस्सारण जोडणीच्या कामांसाठी रस्ते खोदाई शुल्काचे दर कमी केले आहेत. अर्थात कमी केलेले दर सामान्यांसाठी असून, ऑप्टिकल फायबर केबल, गॅस पाइपलाइनसह अन्य कामांसाठी रस्ते खोदाईकरिता व्यावसायिक कंपन्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क जैसे थे ठेवले आहे.
केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाचा निधी देताना महापालिकांनी स्व उत्पन्न वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विविध उपाययोजना करतानाच रस्ते खोदाईसाठी महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात चार ते पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले पाणीपुरवठा, वीजजोडणी, तसेच मलनिस्सारण जोडणीच्या कामांसाठीच्या खोदाई शुल्कात मोठी वाढ झाली होती.
व्यावसायिक कंपन्यांसाठीचेही शुल्क वाढवले आहे. रस्ते खोदाई शुल्कामध्ये तब्बल चार ते पाचपटींपर्यंत वाढ करण्यात आली होती. मात्र, सरसकट वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत होता. केबल, तसेच गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी 'जेसीबीद्वारे एक मीटरपेक्षा अधिक रुंदीचा खड्डा खोदला जातो. त्यातुलनेत सामान्य नागरिकांच्या पाणीपुरवठा, वीजजोडणी, मलनिस्सारण जोडणीसाठी एक चौरस फुटापेक्षाही कमी रुंदीचा रस्ता खोदला जात असल्याने ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक ठरत होती.
या दरवाढीला राजकीय पक्षांकडूनही विरोध झाला होता. अखेर या दरवाढीचे पुनरावलोकन करीत सर्वसामान्य नागरिकांच्या पाणीपुरवठा, वीजजोडणी व मलनिस्सारण जोडणीच्या कामांसाठीच्या रस्ते खोदाईच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
कंपन्यांना वाढीव दर कायम
मोबाइल कंपन्यांकडून ऑप्टिकल फायबर केबलसाठी, तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून घरोघरी गॅस पोहोचवण्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी पाणीपुरवठा, शहरभर खोदलेल्या रस्त्यांबाबतचे दर कायम ठेवले आहेत.
नवीन दर
महापालिकेने सुधारित दर जाहीर केल्यानुसार आता नागरिकांना वीज व ड्रेनेजसाठी डांबरी रस्ता खोदल्यास प्रति चौरस मीटरसाठी ७४७५ रुपयांऐवजी २९९२ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे पाचपट केलेली दरवाढ आता दुप्पट केली आहे. याच कामासाठी काँक्रिट रस्ता फोडल्यास प्रति चौरस मीटरसाठी ४८५४ ऐवजी ३१५४ रुपये आकारले जाणार आहेत. तसेच जलवाहिनीसाठी डांबरी रस्ता खोडल्यास १५७७ रुपये व काँक्रिटरस्ता खोडल्यास १५८७ रुपये प्रतिचौरस या दराने शुल्क भरावे लागणार आहे.