

नाशिक (Nashik): राज्यातील अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामासाठी 18.50 लाख ते 25.05 लाख रुपयांपर्यंतचे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. महिला व बाल विकास विभागाने 600 चौरस फुटांच्या नव्या नमुना आराखड्याला (Type Plan) मंजुरी दिली असून, हे दर पुढील तीन आर्थिक वर्षांतील अंगणवाडी बांधकामांना लागू राहणार आहेत.
यापूर्वीच्या दरांमध्ये अंगणवाडी बांधकाम करणे ठेकेदारांना परवडत नसल्याने मंजुरी मिळूनही अनेक ठिकाणी बांधकाम होत नव्हते. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने क्षेत्रनिहाय सुधारित बांधकाम दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या क्षेत्रासाठी किती नवे दर?
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या इमारती एकाच धर्तीवर असाव्यात, यासाठी यापूर्वी नमुना आराखडा निश्चित करण्यात आला होता. 14 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार बिगर आदिवासी क्षेत्रासाठी प्रति अंगणवाडी 11.25 लाख रुपये, आदिवासी व डोंगराळ क्षेत्रासाठी 12.30 लाख रुपये, तर नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी 14.75 लाख रुपये बांधकाम दर निश्चित होते.
राज्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अधिक ‘बेबी फ्रेंडली’ अंगणवाडी इमारतीचा नवीन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार अंगणवाडी इमारतीचे बांधकाम क्षेत्र 600 चौरस फूट निश्चित करण्यात आले आहे.
नव्या दरानुसार
बिगर आदिवासी क्षेत्र: 18.50 लाख रुपये
आदिवासी व डोंगराळ क्षेत्र: 20.35 लाख रुपये
नक्षलग्रस्त क्षेत्र: 25.05 लाख रुपये
या दरांमध्ये सर्व करांचा समावेश आहे.
मंजूर रकमेत कोणती कामे समाविष्ट?
अंगणवाडीच्या मंजूर रकमेत केवळ इमारत बांधकामाचा खर्च नसून नमुना आराखड्यानुसार शौचालय, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी रॅम्प, विद्युतीकरण, विद्युत पुरवठा, अंतर्गत व बाह्य रंगरंगोटी, बाह्य विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा आणि पाणी साठवणुकीशी संबंधित कामे तसेच सर्व करांचा समावेश आहे.
जुन्या मंजूर कामांना जुनेच दर
नवीन दर लागू झाले असले तरी शासन निर्णयापूर्वी जुन्या आराखड्यानुसार मंजुरी मिळालेली किंवा अपूर्ण असलेली बांधकामे पूर्ण करण्यासाठी जुने दरच लागू राहणार आहेत. त्यामुळे आधीच प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांवर नव्या दरांचा थेट परिणाम होणार नाही.
टेंडरपूर्वी तांत्रिक मान्यता बंधनकारक
अंगणवाडी बांधकामाला प्रशासकीय मान्यता देताना प्रशासकीय मान्यतेच्या रकमेच्या मर्यादेत सक्षम अधिकाऱ्यांकडून तांत्रिक मान्यता घेतल्यानंतरच टेंडर प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
अंगणवाडी इमारत उभारताना संबंधित भागाची भौगोलिक रचना, तापमान, मृदा आणि पर्जन्यमान यांचा विचार करून बांधकामाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
Key Points
अंगणवाडी बांधकामासाठी 600 चौरस फुटांचा नवा Type Plan.
सुधारित दर पुढील तीन आर्थिक वर्षांसाठी लागू.
बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 18.50 लाख रुपये.
आदिवासी व डोंगराळ क्षेत्रासाठी 20.35 लाख रुपये.
नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी 25.05 लाख रुपये.
सर्व करांचा नव्या दरांमध्ये समावेश.
शौचालय, रॅम्प, विद्युतीकरण, रंगरंगोटी व पाणीपुरवठ्याचा खर्च मंजूर रकमेत.
जुन्या मंजूर किंवा अपूर्ण कामांना जुनेच दर.
टेंडरपूर्वी तांत्रिक मान्यता आवश्यक.
भौगोलिक रचना, तापमान, मृदा व पर्जन्यमानाचा विचार करून बांधकाम करण्याचे निर्देश.