105 किमीच्या खानदेश एक्सप्रेस-वेमुळे वाढणार उत्तर महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी
मुंबई (Mumbai): राज्यातील जनतेचा प्रवास सुकर व विनासायास व्हावा. राज्यातील महत्वाच्या शहरांकडे सहा ते आठ तासात पोहचता यावे. यासाठी राज्यात नियंत्रित द्रुतगती मार्गाचे जाळे निर्माण करण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्राच्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी १०५ किलोमीटर लांबीच्या खानदेश प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येत असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
सदस्य सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. राज्यमंत्री मेघना- साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यात इंटरकनेक्टिव्हिटी दिली जाणार असून राज्यातील सर्व तालुके महामार्गाला जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावरील आवश्यक दुरुस्तीच्या करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. या कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
समृद्धी महामार्गावरील अपघात प्रामुख्याने मानवी चुकीमुळे होत असल्याचे सांगून, त्यावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. महामार्गावर फूड मॉल सुरू असून इतर सुविधा व विकासकामे प्रगतीपथावर आहेत. भूसंपादनासाठी देय असलेले मोबदले लवकरात लवकर देण्यात येतील. मुंबईपासून समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी आमणे-ठाणे मार्गावरील पुलांचे काम अंतिम टप्प्यात असून जून महिन्यात वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
सदस्य किशोर दराडे, भाई जगताप, ॲड. अनिल परब, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे यांनीही या लक्षवेधीच्या चर्चेत सहभाग घेतला.

