
पुणे (Pune) : गृहलक्ष्मीला घराची मालकीण करून देणाऱ्या मुद्रांक शुल्कातील सवलत योजनेत पुणे शहराने बाजी मारली आहे. महिलांना एक टक्का सवलत देण्याच्या या योजनेमुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा महिलांच्या नावावर दस्तनोंदणी करणाऱ्यांची संख्या चार हजार २१ ने वाढली आहे. तर एक टक्क्याच्या माध्यमातून महिलांना मुद्रांक शुल्कात नऊ हजार १२८ कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे.
पुणे शहरात दस्तनोंदणीवर पाच टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का मेट्रो सेस आणि एक टक्का एलबीटी असे सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते. या व्यतिरिक्त ३० हजार नोंदणी शुल्क भरावे लागते. राज्यात ज्या शहरांमध्ये मेट्रो नाही, अशा शहरांमध्ये सहा टक्के मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागते. ३१ मार्च २०२१ मध्ये महिलांच्या नावावर दस्तनोंदणी करणाऱ्यांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अशा प्रकारे सवलत घेतलेल्यांना पुढील १५ वर्षे घराची विक्री करता येणार नाही. विक्री केल्यास दंडासह सवलत वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे ही योजना लागू झाल्यापासून त्यास फारसे यश आले नाही.
घर विक्रीची अट काढली
राज्यात २०२२-२३ या कालावधीत केवळ महिलांच्या नावावर ११ हजार ६६ दस्तांची नोंदणी झाली. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच्या आदेशात दुरुस्ती करीत मुद्रांक शुल्कात सवलत घेतलेल्यांना घातलेली १५ वर्षांची अट काढून टाकली. त्याबाबतचा आदेश २६ मे २०२३ रोजी काढला. त्याचा सकारात्मक परिणाम दस्तनोंदणीवर दिसून आला. त्यामुळे गेल्या दोन आर्थिक वर्षांत (२०२३-२४ आणि २०२४-२५) महिलांच्या नावावर घर खरेदी करणाऱ्या दस्त नोंदणीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
असा होतो फायदा
समजा तुम्ही पुणे शहरात ५० लाख रुपये किमतीची सदनिका घेत आहात. दस्तनोंदणीसाठी गेल्यानंतर त्यावर सात टक्के म्हणजे साडेतीन लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार नोंदणी शुल्क (फी) असे तीन लाख ८० हजार रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. परंतु तीच सदनिका तुम्ही महिलांच्या नावावर खरेदी करणार असाल तर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळणार आहे. म्हणजे तीन लाख रुपये मुद्रांक शुल्क व ३० हजार नोंदणी शुल्क म्हणजे ३ लाख ३० हजार रुपयेच भरावे लागणार आहेत. त्यामुळे तुमची ५० हजार रुपयांची बचत होणार आहे. अशा प्रकारे २०२३-२४ या वर्षांत महिलांना ७२ कोटी ८३ लाख ५२ हजार ८९५ रुपयांची मुद्रांक शुल्कात सवलत मिळाली आहे.
महिलांच्या नावावर घर खरेदी करण्यास चालना मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा नागरिकांना होत आहे. महिलांच्या नावावर घर खरेदी करून मुद्रांक शुल्कात सवलत मिळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
- संतोष हिंगाणे, सह जिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
अशी झाली दस्तनोंदणी
२९ लाख ५७ हजार ८२८
- राज्यातील दस्तनोंदणी
२ लाख ७९ हजार ३९५
- पुण्यातील दस्तनोंदणी
१३ हजार ५८०
- पुण्यात महिलांचे नाव (२०२४-२५)
९ हजार ५६९
- पुणे, पिंपरीत महिलांचे नाव (२०२३-२४)