
पिंपरी (Pimpri) : वारंवार आवाहन करूनही वीज ग्राहकांनी देयके न भरल्याने महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा १० हजार ८२० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
पुणे परिमंडलामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांकडे अद्यापही ८२ कोटी ९७ लाख रुपयांच्या वीज देयकांची थकबाकी आहे. थकबाकीचा भरणा करता यावा, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीज देयके भरणा केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात आली होती.
परंतु अनेकदा आवाहन करुनही वीज देयके न भरल्याने महावितरणने नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू ठेवली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील १० हजार ८२० थकबाकीदारांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या १८ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
चालू व थकीत वीज देयकांचा घरबसल्या भरणा करता यावा यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.