.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिंपरी (Pimpri) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी - MIDC) परिसरात पावसाळापूर्व कामे झालेली नाहीत. परिणामी, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचत आहे. (Bhosri MIDC, Chakan MIDC News)
वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पावसाळापूर्व कामे आतापर्यंत होणे अपेक्षित आहे. पण, एमआयडीसी प्रशासन अजून टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डरमध्येच अडकली असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरालगत भोसरी आणि चाकण येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र विकसित झाले आहे. चाकण एमआयडीसी परिसर ६०७ एकरावर, तर भोसरी एमआयडीसी परिसर ३,५०० एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे.
या परिसरामध्ये आठ हजारांहून अधिक प्लॉटधारक असून, बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे पाच हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात दररोज लाखो कामगार काम करतात.
भोसरी आणि चिंचवड एमआयडीसी परिसरात विविध सुविधा देण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आणि चाकण एमआयडीसी परिसरात सुविधा देण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे.
रस्त्यांच्या बाजूला असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये मोठ्या प्रमाणात माती, कचरा साचला आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सखल भागात पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे. पण, पावसाळा तोंडावर आला असतानाही एमआयडीसी परिसरात अजूनही पावसाळापूर्व कामे हातात घेतलेली नाहीत.
प्रशासन अजून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आणि वर्क ऑर्डर काढण्यात व्यस्त आहे. मे महिना संपत आला तरी अजून प्रशासनाने पावसाळापूर्व कामे का केली नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते.
नागरिकांना आणि वाहनचालकांना रस्त्यांवरून चालणे कठीण झाले होते. एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या क्रॉक्रिटीकरणाचे कामही संथगतीने सुरू असल्यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हे कामे होणार
- सखल भागात पाणी साचू नये म्हणून आरसीसी पाइप टाकणे
- रस्त्यावरील खड्डे भरणे
- रस्त्यांच्या बाजूला असलेल्या पाणीवाहून नेणाऱ्या नलिका स्वच्छ करणे
अनपेक्षित पाऊस सुरू झाला आहे. आम्ही टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. कामांचे वर्क ऑर्डर देणे बाकी आहे. लवकरच वर्क ऑर्डर देऊन कामे सुरू केली जातील
- सतीश चौडेकर, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी