
पुणे (Pune) : पुणे महापालिकेचा प्रकल्प विभाग, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय नसल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र सध्या आहे. प्रकल्प विभागाकडून उड्डाणपुलाचे काम करताना रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही, खड्डे मोठ्या प्रमाणावर आहेत. अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे. अरुंद रस्त्यावर बिनधास्त चारचाकी, दुचाकी आडव्या लावलेल्या असतानाही वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यातच धन्यता मानता आहेत. (Sinhgad Road Traffic)
सिंहगड रस्त्यावर माणिकबाग ते राजाराम पूल या भागात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. भर पावसाळ्यात माणिकबागेत काम सुरू करून नागरिकांना कोंडीत ढकलण्याचे काम प्रकल्प विभागाने व ठेकेदाराने केले आहे. या भागात काम सुरू होऊन दोन महिने झाले तरीही येथील रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग जैसे थे आहे. माणिकबागेसह विठ्ठलवाडी ते हिंगणे चौकादरम्यान अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहतूक कोंडी होत असल्याचे दुकानदारांना लक्षात येऊनही त्यांच्याकडूनही समजूतदारपणा दाखवला जात नाही अशीच स्थिती यादरम्यान आहे.
अनधिकृत पथारीला अभय
सिंहगड रस्त्यावर माणिकबाग, गोयल गंगा परिसरात अनेक ठिकाणी पादचारी मार्गावर अनधिकृत पथारी व्यावसायिक आहेत. त्यांच्यावर अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करते, पण या भागातील अधिकृत व्यावसायिकांना मात्र, नियमांचा धाक दाखवून त्रास दिला जात आहे.
फेरीवाला प्रतिबंधित क्षेत्र कायमस्वरूपी राहावे यासाठी अतिक्रमण विभाग आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय यांच्यातर्फे दोन गटात कारवाई केली जाणार आहे. मुख्य चौकांमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी वॉर्डनची नियुक्ती केली आहे. आनंदनगर सन सिटी रस्त्याला कायमस्वरूपी अतिक्रमण विभागाची गाडी उभी करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे काम जेथे सुरू नाही तेथील बॅरिकेट्स काढून रस्ता मोकळा केला आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे.
- प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
वाहतुकीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांवर भर देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. सुट्ट्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कर्मचारी त्या ठिकाणी सर्वाधिक नेमावे लागले. नागरिकांची वाहने बंद पडत असल्यानेही वाहतूक कोंडीत होत आहे. नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
- उदयसिंह शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक