
पिंपरी (Pimpri) : पुणे लोणावळा दरम्यान सुरू असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गाला तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची प्रतिक्षा आहे. सध्या या कामाला कोणतीही मिळालेली नाही. त्यामुळे प्रवाशांची ही मागणी कधी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या पुणे-लोणावळा लोकलच्या दिवसभरात ६०.५९ किलोमीटर अंतर कापत दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत ४४ फेऱ्या होतात. कोरोनानंतर लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या. शिवाजीनगरला लोकलसाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करून येथून तळेगाव आणि लोणावळ्यासाठी चौदा लोकल धावतात.
नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले. त्यामुळे रेल्वे गाड्या अचूक वेळेत धावून प्रवासाच्या वेळेत बचत झाली. या मार्गावर असणारा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा ताण लक्षात घेता उपनगरीय सेवेसाठी स्वतंत्र मार्गाची गरज व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने रेल्वे मार्ग विस्तारीकरणाच्या चर्चेला सुरूवात झाली.
या प्रकल्पासाठी लागणारा खर्च पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी उपलब्ध करून द्यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारने सादर केला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या विषयाला पुढे गती मिळालेली नाही. त्यामुळे विस्तारीकरणाचा विषय कागदावरून प्रत्यक्षात कधी येणार असा प्रश्न आहे.
या बाबत पुणे रेल्वे प्रशासनाकडे विषयच आला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर विस्तारीकरणावर ‘जैसे थे’ स्थिती असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे स्थानके
पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, बेगडेवाडी, घोरावाडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली, लोणावळा अशी ६०.५९ किलोमीटर अंतरावर १७ स्थानके आहेत. त्यातील शिवाजीनगर, खडकी, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, मळवली या स्थानकांवर रेल्वे पासिंगसाठी सुविधा देण्यात आली आहे.
प्रवासी संघटनांचे म्हणणे
- पुणे-लोणावळा स्वयंचलित सिग्नल यंत्रणा पूर्ण झाल्याने दोन गाड्यांमधील अंतर कमी झाले आहे. याचा फायदा लोकलच्या प्रवाशांना मिळावा
- गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात
- मार्गावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेने लवकरात लवकर पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या लाइनचे काम सुरू करणे आवश्यक आहे
- तिसरी आणि चौथी मार्गिका लवकर सुरू करणे
- पीक अवरमध्ये फास्ट लोकल सुरू करणे
- दुपारच्या वेळी लोकल फेऱ्या सुरू कराव्यात
विस्तारीकरणात हे असणार नियोजन
रेल्वे स्थानकावर फूटओव्हर ब्रीज, प्रशस्त व नवी प्रतीक्षा रूम, प्रत्येक फलाटावर अत्याधुनिक स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरण पूरक वातावरण, आवश्यकतेनुसार चार लिफ्ट, दोन सरकते जिने, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करून दिले जाण्याचे नियोजन केले आहे.
पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे नियोजन आहे. मात्र, या कामाची ‘जैसे थे’ स्थिती आहे. अद्याप पुढील कार्यवाही झालेली नाही.
- श्रीरंग बारणे, खासदार.
या विषयाबाबत वरिष्ठांशी चर्चा केली. मात्र, असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे प्रशासन, पुणे
लोकलच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. अनेकदा काही अडचणी येतात. वेळेत जाता येत नाही. त्यामुळे अधिक फेऱ्या वाढविण्यासाठी ट्रॅक वाढविणे आवश्यक आहे.
- रमेश शेलार, प्रवासी
रेल्वे ट्रॅक वाढविले पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय सुरू आहे. ट्रॅक वाढविल्यास नागरिकांना अधिक फायदा होईल. प्रवास करणे सुखकर होणार आहे.
- प्रथमेश पाटील, प्रवासी