
पुणे (Pune Sinhgad Road Traffic) : सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यान या दरम्यानच्या कालव्यालगतच्या रस्त्यावर महापालिकेच्या (PMC) नावाने दोन्ही बाजूंना राजरोसपणे राडारोडा टाकला जात आहे.
भरदिवसा टाकला जातोय राडारोडा
भरदिवसा हे प्रकार सुरू असूनही महापालिका प्रशासनाला मात्र त्यांची कोणतीही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल ते फन टाइम थिएटर या दरम्यान उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. तत्पूर्वी या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून वडगाव ते पु. ल. देशपांडे (जनता वसाहत) या दरम्यान नवीन मुठा कालव्यालगत ७.५ मीटर रुंदीचा रस्ता तयार करून पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी तो वाहतुकीसाठी खुला केला.
प्रशासनाला कल्पनाच नाही
मागील काही दिवसांपासून विश्रांतीनगर ते जनता वसाहत या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिवसाढवळ्या राडारोडा टाकला जात आहे. मोठे डंपर येऊन येथे राडारोडा खाली करतात. संबंधितांना हा राडारोडा कोणाचा आहे, असे विचारल्यानंतर हा राडारोडा महापालिकेचाच असल्याचे सांगितले जाते. याबाबत पथ विभाग आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांना याची काहीच कल्पना नसल्याचे समोर आले.
कारवाईचे करणार
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले की, यासंदर्भात माहिती घेऊन राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल