
पुणे (Pune) : भुवनेश्वरहून पुण्याला येणारे एअर इंडियाचे (Air India) विमान (आयएक्स १०९७) हे पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रक्रियेत होते. विमान सुमारे १०० फूट उंचीवर असतानाच वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळून आला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वैमानिकाने लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला. अन् पुन्हा विमान हवेत झेपावले.
विमान १०० फुटांपेक्षा आणखी काही फूट खाली असते तर, मात्र वैमानिकाला पुन्हा विमानाला वर घेणे अवघड झाले असते. कुत्र्याला हुसकावून लावल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. मात्र, यामुळे विमानाला सुमारे एक तासाचा उशीर झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
पक्ष्यांच्या घिरट्यांमुळे मेटाकुटीला आलेले विमानतळ प्रशासन कुत्र्यांचा वावर वाढल्याने देखील चिंताक्रांत झाले आहे. पक्षी, कुत्रा व बिबट्या हे धावपट्टीवर आढळून येत असल्याने विमान वाहतुकीला केवळ अडथळाच नाही तर ही धोक्याची नांदी ठरत आहे. विमानतळ प्रशासन पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न करीत आहे. तरी त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहे. यापूर्वी देखील पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर अनेकदा कुत्रा आढळून आला आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये कुत्रा आला होता. त्यावेळी देखील वैमानिकाने उड्डाण रद्द केले होते.
आता देखील कुत्रा धावपट्टीवर आढळून आल्याने वैमानिकाने लँडिंग रद्द केले. त्यानंतर वैमानिकाला घिरट्या (गो अराऊंड) घालण्यास सांगण्यात आले. दरम्यान, कुत्र्याला हुसकावून लावण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सायंकाळी सात वाजून १२ मिनिटांनी हे विमान पुणे विमानतळावर सुखरूपपणे उतरले.
अन प्रवाशांना झटका बसला
‘‘विमान धावपट्टीवर उतरत असतानाच अचानक हवेत झेपावले. त्यावेळी आम्हाला थोडा झटका बसला. थोड्या वेळानंतर वैमानिकाने विमानात उद्घोषणा केली की, धावपट्टीवर कुत्रा आढळून आल्याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने घिरट्या घालण्यास सांगितले आहे. सुमारे ३० ते ४० मिनिटे हे विमान घिरट्या घालत राहिले. त्यानंतर सायंकाळी सात वाजून १२ मिनिटांनी हे विमान पुणे विमानतळावर उतरले,’’ असे विमानातील प्रवासी हितेंद्र कुरणे यांनी सांगितले.
पर्यावरण समिती आहे कुठे
१) विमानतळ परिसरातील पर्यावरणीय व्यवस्थापन, ध्वनी आणि प्रदूषणावर नियंत्रण, तसेच विमान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी प्रत्येक प्रमुख विमानतळावर ‘विमानतळ पर्यावरण समिती’ कार्यरत असते. या समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत.
२) धावपट्टीजवळ पक्षी, कुत्रे, डोंगर या गोष्टींमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी करण्यासाठी उपाय सुचविणे, हे समितीचे प्रमुख काम आहे.
३) गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विमानतळावर पक्षी, कुत्रे, बिबट्या यांचा वावर वाढला असताना देखील ही समिती नेमक्या कोणत्या उपाययोजना आखत आहेत, याची माहिती नाही.