

पुणे (Pune): पुणे विमानतळावर पहिल्यांदाच सीमाशुल्क विभागाने बॉडी कॅमेराचा वापर सुरू केला आहे. विभागाचे अधीक्षक व निरीक्षक यांच्या गणवेशावर हे कॅमेरे लावण्यात आले आहेत.
केवळ रेड चॅनेलमधून येणाऱ्या व संशयित आंतरराष्ट्रीय प्रवाशांची व बॅगेची तपासणी ऑन कॅमेरा केली जात आहे. यामुळे सीमा शुल्क विभागाच्या कामकाजात आणखी पारदर्शकता येईल. शिवाय प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग टाळण्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे विमानतळावरून तीन आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा सुरू आहे. यात दुबई, बँकॉक व अबुधाबी या शहरांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत दुबईहून पुण्याला येणाऱ्या विमानात सोने तर बँकॉकहून पुण्याला येणाऱ्या विमानात वन्यजीव, अमली पदार्थ आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर सीमा शुल्क विभागाने रेड चॅनेलमधून येणाऱ्या विशेषतः संशयित प्रवाशांची तपासणी ऑन कॅमेरा करण्याचा निर्णय घेतला.
पुणे विमानतळावर मर्यादित आंतरराष्ट्रीय सेवा असली तरी सीमा शुल्क विभागाचे अधिकारी २४ तास विमानतळावर कार्यरत असतात. पुणे विभागाला सहा कॅमेरे मिळाले असून प्रत्येक शिफ्टमध्ये दोन कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे.
बॉडी कॅमेऱ्याचा फायदा
- अनेकदा तपासणीच्या नावाखाली आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केले जातात. मात्र, आता प्रत्येक कृती रेकॉर्ड होत असल्याने गैरप्रकारांना वाव उरणार नाही. यामुळे प्रामाणिक अधिकारी आणि प्रवासी दोघांनाही संरक्षण मिळेल.
- सोन्याची तस्करी किंवा अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे सोपे झाले आहे. तपासणीचे सर्व चित्रीकरण होईल, त्यामुळे याचा पुरावा न्यायालयात नाकारणे कठीण असल्याने तस्करांवर वचक बसेल.
- बॅगेत काय आढळले किंवा अधिकाऱ्यांनी कशी वागणूक दिली, यावरून अनेकदा प्रवासी समाज माध्यमांवर तक्रारी करतात. आता चित्रीकरण (लाइव्ह फुटेज) उपलब्ध असल्याने सत्य काय आहे, हे काही मिनिटांत स्पष्ट होईल. त्यामुळे अधिकारी व प्रवासी यांच्यात वाद होणार नाही.
बॉडी कॅमेऱ्याच्या वापरामुळे तपासणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आली आहे. सीमाशुल्क विभागाचे अधिकारी आणि प्रवासी यांच्यातील वादाचे प्रसंग कमी होण्यास मदत होतेय, शिवाय तस्करीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना रोखण्यासाठी भक्कम डिजिटल पुरावा उपलब्ध झाला आहे.
- डी. अनिल, आयुक्त, सीमा शुल्क विभाग, पुणे