Pune Traffic News पुणे : ‘‘हिंजवडीतील आयटी पार्कमधील (Pune Hinjawadi IT Park) १६ कंपन्या पुणे जिल्ह्यातच स्थलांतरित झाल्या आहेत. याबाबत हिंजवडी आयटी कंपन्यांच्या असोसिएशनशी बोलणे झाले आहे. या कंपन्या कोठेही दुसरीकडे गेलेल्या नाहीत. त्यांचा रस्त्याचा विषय होता, त्यासंदर्भात दोन दिवसांत बैठक घेणार आहे,’’ असा खुलासा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.
पुणे दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. आयटी कंपन्या, एखादा प्रकल्प राज्याबाहेर गेला, असा उगाच काही लोक टाहो फोडत आहेत,’ असा उल्लेख करत सामंत यांनी विरोधकांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
ते म्हणाले, जे घडले नाही, ते घडले आहे, असे दाखविले जात आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये राजकारण करा, परंतु उद्योगांशी कोणीही राजकारण करू नये.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उद्योजकांची बैठक घेणार आहेत, याविषयी सामंत म्हणाले, ‘‘लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी बैठक घेतली आणि त्याचा फायदा शासनाला होत असेल, तर त्यांच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. परंतु, त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि मित्र पक्षाच्या युवा नेत्यांना देखील हा सल्ला द्यावा. उद्योजकांवर टीका करणे, हे राज्याच्या आणि देशाच्या उद्योगजगतासाठी योग्य नाही. तसेच उद्योजकांच्या घराखाली जिलेटीन ठेवणे बंद झाले पाहिजे, अशी विनंती मी पवार यांना करतो.’’
‘‘प्रतापराव जाधव चार वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. राज्यातही मंत्री म्हणून काम केले आहे. तीनदा ते आमदार राहिले आहेत. ते सर्वसामान्य शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांचा स्वत:चा मुलगा तिसऱ्यांदा निवडून येऊनही त्यांनी खऱ्या शिवसैनिकाला न्याय दिला आहे. ही खरी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. आमच्यात कोणतीही नाराजी नाही,’’ असे सामंत यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघातून तीनदा निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबद्दल विचारले असता, सामंत यांनी हे उत्तर दिले.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे जर्मनीला पोचले आहेत. मी देखील एका दिवसासाठी सामंजस्य करार करण्यास तेथे जाणार आहे. राज्य सरकार एमआयडीसीच्या माध्यमातून कौशल्य केंद्रे उभारत आहे. यात जर्मनीला आवश्यक असणारे कुशल कामगार आपण तयार करणार आहोत आणि त्यांना तिकडे पाठविणार आहोत, असे सामंत यांनी सांगितले.