पुणे (Pune) : पुण्याच्या निवासी क्षेत्रात वर्षे २०२४च्या पहिल्या सात महिन्यांतच एक लाखांहून अधिक घरांची विक्री नोंदणी झाली असून, जुलैमध्ये हा टप्पा पार करून घरांच्या विक्रीतील गेल्या दोन वर्षांतील सर्वांत वेगवान वाढ नोंदवली आहे. (Real Estate In Pune)
पुण्यातील गृहखरेदीदारांमधील वाढता आत्मविश्वास, परवडणारी क्षमता आणि मालमत्तेच्या मालकीबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन या वाढीतून स्पष्ट होत आहे, असे नाइट फ्रँक इंडियाने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
पुण्यात जानेवारी ते जुलैपर्यंतच्या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये १,१३,२७७ घरांच्या विक्रीची नोंदणी झाली असून, २०२३ मध्ये एक लाखांचा टप्पा सप्टेंबरमध्ये ओलांडला गेला होता. त्या तुलनेत या वर्षी अधिक वेगवान वाढ झाली आहे. विक्रीतील वाढही याच कालावधीच्या तुलनेत ४५ टक्के असून, या नोंदणींमधून मुद्रांक शुल्क संकलनातही ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सात महिन्यांतील एकूण मुद्रांक शुल्क संकलनाने ४१२७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
जुलै महिन्यात शहरात १३,३१४ मालमत्तांची विक्री नोंदणी झाली असून, मागील वर्षीच्या याच वेळेच्या तुलनेत त्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात एकूण ५०४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क संकलन झाले असून, त्यात वार्षिक ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुख्यतः मध्यम श्रेणी आणि आलिशान घरांच्या वाढत्या मागणीमुळे या महिन्यात घरांच्या नोंदणीतही वार्षिक २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
घरांच्या नोंदणीत ५० लाख ते एक कोटी रुपयांच्या श्रेणीत सर्वाधिक ३३ टक्के नोंदणी झाली असून, एक कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या निवासी मालमत्तांचाही हिस्सा अधिक आहे. ८०० चौरस फूट आणि त्याहून अधिक आकाराच्या घरांचा हिस्सा जुलैमध्ये सात टक्क्यांनी वाढला असून, जुलै २०२३ मध्ये २४ टक्के होता. तो जुलै २०२४ मध्ये ३१ टक्के झाला आहे. याउलट, ८०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या असलेल्या अपार्टमेंटची मागणी जुलै २०२४ च्या तुलनेत सात टक्क्यांनी कमी झाली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
असे आहे चित्र
- जुलै महिन्यात शहरात १३,३१४ घरांची विक्री, जुलैमध्ये मालमत्तेची नोंदणी २५ टक्के वाढ
- जुलै २०२४ साठी राज्य सरकारचे मुद्रांक शुल्क संकलन ५०४ कोटी, वार्षिक ४७ टक्के वाढ
- जानेवारी २०२४ पासून १,१३,२७७ पेक्षा जास्त घरांची विक्री, मुद्रांक शुल्क ४१२७ कोटींहून अधिक
पुण्यातील निवासी क्षेत्र मजबूत आहे, मालमत्ता विक्री नोंदणीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४५ टक्क्यांची प्रभावी वाढ झाली आहे, तर मुद्रांक शुल्क संकलनात वार्षिक ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गृहखरेदीदार मध्यम आणि मोठ्या घरांच्या पर्यायांकडे आकर्षित झाल्याने लक्षणीय वाढ झाली असून, व्यवसायात भरभराटीचे वातावरण आहे.
पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि आर्थिक प्रगतीमुळे खरेदीला चालना मिळाली असून, निवासी क्षेत्राची भरभराट होत आहे. ही वाढ भविष्यातील वाढीचे संकेत देत आहे.
- शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया