Pune Airport : 4 विमानांचा मार्ग बदलला, 8 विमानांना उशीर; पुणे विमानतळावर नक्की काय झाले?
पुणे (Pune) : सुखोई विमान बुधवारी (ता. १४) सराव संपवून पुणे विमानतळाच्या (Pune Airport) धावपट्टीवर उतरत असताना अचानक आठ ते दहा फूट उंचीवरून खाली आदळले. सुखोईचे हार्ड लँडिंग (Hard Landing) झाल्याने हवाई दलाने (Indian Air Force) सुमारे ४० मिनिटांसाठी धावपट्टी बंद केली.
धावपट्टीचे काही नुकसान झाले का, हे पाहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून धावपट्टी प्रवासी विमानांसाठी बंद केली होती. यादरम्यान चार विमानांचा मार्ग बदलला; तर सात ते आठ विमानांना उशीर झाला. धावपट्टी बंद झाल्याने पुणे विमानतळाचे वेळापत्रक बिघडले होते. परिणामी प्रवाशांना फटका बसला.
पुणे विमानतळ हवाई दलाचे बेस स्टेशन आहे. त्यामुळे येथे नेहमीप्रमाणे सुखोईच्या वैमानिकाचा सराव सुरू होता. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सुखोई जमिनीवर उतरत असताना अचानक आठ ते दहा फूट उंचीवरून धावपट्टीवर आदळले. सुदैवाने लँडिंग गियरचे काही नुकसान झाले नाही; मात्र सुखोईचे वजन (१८ हजार ४०० किलो) आणि वेग (लँडिंगचा २३० किलोमीटर प्रति तास) याचा परिणाम धावपट्टीवर होऊ शकतो.
धावपट्टीचे नुकसान झाल्यास प्रवासी विमानांना लँडिंग करताना अपघाताचा धोका असतो. त्यामुळे हवाई दलाने तत्काळ ‘नोटम’ (नोटीस टू एअरमन) दिले. त्यामुळे पुणे विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाने सर्व प्रवासी विमानांसाठी धावपट्टी एक तासासाठी बंद केली. परिणामी विमानतळाचे वेळापत्रक बिघडले.
का झाले हार्ड लँडिंग?
विमानाचे हार्ड लँडिंग दोन गोष्टींमुळे होऊ शकते. वैमानिकाच्या चुकीमुळे अथवा वाऱ्याचा प्रभावामुळे. यात साधारणपणे लँडिंग गियर खुले झाल्यानंतर आठ ते दहा फूट उंचीवरून विमान धावपट्टीवर आदळल्यास टायरचे अथवा धावपट्टीचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. बुधवारच्या घटनेत तसे काही घडले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
धावपट्टीची पाहणी करण्यासाठी सुमारे ४० मिनिटांसाठी धावपट्टी बंद ठेवली होती. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टीची पाहणी केल्यानंतर ११ वाजून १० मिनिटांनी ‘नोटम’ हटविले. त्यानंतर प्रवासी विमाने पुणे विमानतळावर उतरण्यास सुरुवात झाली.
धावपट्टी बंद ठेवणे का महत्त्वाचे?
सुखोईचे वजन साधारणपणे १८ हजार ४०० किलो इतके आहे; तर सरासरी वेग दोन हजार ३९० किलोमीटर प्रति तास इतका आहे. याचा वेग लँडिंगवेळी सुमारे २३० किलोमीटर असतो. इतक्या वेगाने विमान खाली आदळल्यास धावपट्टीचे नुकसान होते. यात धावपट्टीवर छोटे खड्डे अथवा माती उखडली जाण्याची शक्यता असते, असे झाल्यास अन्य प्रवासी विमानांच्या टायरला धोका होऊ शकतो. त्यात विमान घसरण्यापासून ते इंजिनमध्ये छोटे दगड जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विमानाचा अपघातही होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ धावपट्टीचे काही नुकसान झाले आहे का? हे पाहणे अत्यंत गरजेचे असते.
या विमानांना फटका
१. इंडिगोचे चेन्नईहून पुण्याला येणारे विमान हैदराबादला वळविले.
२. इंडिगोचे दिल्लीहून पुण्याला येणारे विमान मुंबईला वळविले.
३. विस्ताराचे दिल्लीहून पुण्याला येणारे विमान मुंबईला वळविले.
४. एअर इंडियाचे बंगळूरहून पुण्याला येणारे विमान पुन्हा बंगळूरला परतले.
५. यासह सात ते आठ विमानांना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे एक ते दीड तासाचा उशीर.
पायलटची चूक अथवा वाऱ्यामुळे हार्ड लँडिंग होऊ शकतो. यात विमानाचे वजन व वेग किती आहे. त्यावर धावपट्टीवर होणारे परिणाम अवलंबून असतात. सरावादरम्यान असे प्रकार घडू शकतात.
- भूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)