पुणे (Pune) : लोहगाव येथे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत डी. वाय. पाटील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत. डी. वाय. पाटील रस्ता हा लोहगावातील मुख्य रस्त्यांपैकी एक आहे. या परिसरात अनेक उचभ्रू सोसायट्या असून, हा रस्ता पुढे जाऊन चऱ्होली गावाला मिळतो.
या रस्त्यावर नियमित वर्दळ असते. याठिकाणाहून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मागील काही दिवसांपासून या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या संदर्भात सर्वच स्तरातून टीका झाल्याने प्रशासनाने हे काम हाती घेतले, मात्र हाती घेतलेल्या कामात नियमितता नसून, दर्जाहीन काम होत असल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत.
वास्तविक या रस्त्याचे काम करत असताना रस्त्यात येणारे ओढे, नाले यांचा विचार करणे गरजेचे होते. मात्र हे काम करतेवेळी या गोष्टी कुठेही विचारात न घेता, सरसकट खडीचे आच्छादन टाकून डांबरीकरण सुरू आहे. तसेच पावसाळी वाहिन्यांचे प्रयोजन न केल्याने भविष्यात पाणी जाणार कोठून? असा सवाल नागरिक विचारत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सागर खांदवे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात तक्रार केली असून, कामाचा दर्जा सुधारण्याची मागणी केली आहे.