
पुणे, ता. १० : तुमच्या मुलांना तुम्ही पुण्यात कुठे फिरण्यासाठी घेऊन जाता? त्यावर, शनिवारवाडा, सारसबाग, पेशवेपार्क किंवा कात्रज येथील प्राणिसंग्रहालय, अशी तुमची उत्तरे नक्कीच येतील. पण मुलांच्या पंखांमध्ये बळ निर्माण करणारी, जगभरातील विमान क्षेत्रातील इत्थंभूत माहिती असलेली ‘एव्हिएशन गॅलरी’ आपल्या पुण्यातच आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत तरी कसे असणार, कारण ‘एव्हिएशन गॅलरी’ तयार होऊन दीड वर्ष उलटली, मात्र अजूनही गॅलरी चालविण्यासाठी आवश्यक विमान क्षेत्रातील किंवा त्यासंबंधीची संस्था पुढे येत नसल्याचे दुर्दैव आहे. त्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न करण्याचे कष्ट देखील महापालिकेने घेतले नाही. त्यामुळे सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून उभारलेली ‘एव्हिएशन गॅलरी’ बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
का सुरू केला प्रकल्प?
- पुणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना विमानांबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी
- प्रदर्शन, प्रत्यक्ष विमान, हेलिकॉप्टरचे मॉडेल्स, ड्रोन, एरोमॉडलिंग, पॅरामोटरिंग व अंतराळ विज्ञान पाहता यावे
- त्यातूनच मुलांना विमान, अंतराळ विज्ञान क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळावी
- या उद्देशाने शिवाजीनगर गावठाणातील महापालिकेच्या शाळेमध्ये ‘एव्हिएशन गॅलरी’ सुरू
अशी आहे ‘एव्हिएशन गॅलरी’
- पहिल्या मजला : विमानांचा इतिहास, विज्ञान खोली, जगभरातील विमानांचे मॉडेल्स
- दुसरा मजला : विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन, विमानतळाचे मॉडेल्स, भारतीय वायुसेनेचा इतिहास
- तिसरा मजला : एरोमॉडेलिंग, पॅरामोटरिंग व अंतराळ विज्ञान प्रदर्शन
म्हणून संस्था पुढे येत नाहीत!
महापालिका प्रशासनाने प्रारंभी विद्यार्थ्यांना २५ रुपये, तर प्रौढांसाठी ५० रुपये तिकिटाचा प्रस्ताव दिला होता. त्यास विरोध होऊन सर्वसाधारण सभेमध्ये विद्यार्थ्यांना १० रुपये, प्रौढांसाठी २५ असा तिकीट दर ठेवण्याचा ठराव झाला होता. मात्र ‘एव्हिएशन गॅलरी’ सुरु ठेवण्यासाठी हा दर परवडणारा नसल्यामुळे त्याचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी विमान क्षेत्र किंवा त्यासंबंधी कंपनी, संस्था आत्तापर्यंत पुढे आलेली नाही.
‘एव्हिएशन गॅलरी’ चालविण्यासाठी महापालिकेला गेल्या दीड वर्षांपासून विमान क्षेत्रासंबंधी कंपनी, संस्था मिळत नसल्यामुळे ती बंद आहे. महापालिकेने त्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. भविष्यात लहान मुलांमधून वैमानिक, वैज्ञानिक घडू शकतील, याचा महापालिका प्रशासनाने विचार करावा.
- ज्योत्स्ना एकबोटे, माजी नगरसेविका
एव्हिएशन गॅलरीसंबंधी सर्व माहिती घेतली जाईल. ती सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू.
- चेतना केरूरे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, पुणे महापालिका