पुणे (Pune) : पुणे शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांसाठी नियमावली केलेली असली तरी याकडे महामेट्रोतर्फे दुर्लक्ष केले जात आहे. स्वारगेट येथील मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी व रेडिमिक्स प्लांटच्या भोवती दोन दिवसांत पत्रे व हिरवे कापड लावावे. अन्यथा काम बंद केले जाईल, अशा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला आहे.
मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून, त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यानंतर केंद्र सरकारने सर्वच राज्य सरकारांना हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना नियमावली घालून दिलेली आहे. त्यानुसार राज्य शासनाने महापालिकेला ही नियमावली पाठवून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वारगेट येथील जेधे चौकात मेट्रो हब व बहुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या चौकात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषण होत असते. मेट्रो हबच्या ठिकाणी बांधकामासाठीचा आरएमसी प्लांटही असून खडी, सिमेंट वाहून आणणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. पण या ठिकाणी काम करताना मेट्रोकडून नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार आली आहे. त्यामुळे विक्रम कुमार यांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन दिवसांत या हबच्या सर्व बाजूने पत्रे मारावेत व हिरवी जाळी लावावी, अन्यथा काम बंद केले जाईल, असा इशारा दिला आहे.