
पुणे (Pune): बालगंधर्व रंगमंदिरातील वाहनतळ हॉटेल व्यावसायिकाला वापरायला दिल्याचा प्रकार समोर येऊन १५ दिवस उलटून गेले. तरीही पुणे महापालिका प्रशासन केवळ नोटीस देणे, खुलासा मागविणे असे कागदी घोडे नाचवत आहेत.
प्रत्यक्षात ठेकेदारावर कारवाई झाली नाही अन् तेथील कामातही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रशासन ठेकेदाराला पाठीशी का घालत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुणे शहराच्या विविध भागांत नाट्यगृह आहेत. तेथे येणारे नागरिक, कलाकारांच्या वाहनांना लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सर्वाधिक कार्यक्रम असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते.
शहरातील कोणत्याही नाट्यगृहामध्ये वाहनतळ चालविण्यासाठी ठेकेदार नियुक्त केला गेलेला नाही. पण बालगंधर्व रंगमंदिरात प्रशासनाने गेल्यावर्षी टेंडर काढून तेथील वाहनतळ एका ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले आहे. याठिकाणी दुचाकी, चारचाकीसाठी किती शुल्क घेतले जाते, याचे फलक लावलेले नाहीत. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम नसला, गर्दी नसली तरीही तेथील वाहनतळ भरलेलेच असते.
या वाहनतळामध्ये घोले रस्त्यावरील एका हॉटेलमधील ग्राहकांची वाहने लावली जात होती. ही वाहने घेऊन जाणाऱ्या चालकाने नागरिकांशी अरेरावी करत आमच्या हॉटेलने हे पार्किंग विकत घेतले असल्याचे सांगितले. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासन, ठेकेदार, हॉटेल व्यावसायिकांतील साटेलोटे समोर आले आहेत.
यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. आयुक्तांनीही त्वरित कारवाई करावी, असे आदेश दिले होते. पण दोन आठवडे उलटून गेले तरीही कारवाई झालेली नाही.
मी कारवाईचे आदेश दिले होते. ती का झाली नाही, याची माहिती घेतो. हे टेंडर त्वरित रद्द केले जाईल. या पार्किंगचे व्यवस्थापन महापालिकेनेच केले पाहिजे.
- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका