
पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी निवड व्हावी, यासाठी महापालिकेचे काही अधिकारी गेले काही महिने मंत्रालयात गळ टाकून होते, पण त्यांना अपयश आल्याने त्याची चर्चा बंद झाली होती. मात्र, अचानकपणे परिमंडळ चारचे उपायुक्त संदीप कदम यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.
महापालिकेच्या परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी प्रसाद काटकर यांची नियुक्ती केली आहे, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार काढल्यानंतर उपायुक्त आशा राऊत यांना अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.
पुणे महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागाला गेल्या काही वर्षांत सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया ही कामे मिळविण्यासाठी अनेक संस्था, मोठे ठेकेदार प्रयत्नशील असतात. या निर्णय प्रक्रियेत विभागप्रमुखांची भूमिका महत्त्वाची असते.
गेल्या वर्षभरापासून आशा राऊत यांनी या विभागाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांच्या जागी कदम यांची नियुक्ती करण्यात आल्याने महापालिका प्रशासनात चर्चा रंगली आहे.
मंत्रालय अन् बारामतीतून आशीर्वादाचा प्रयत्न
महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी मिळावी, यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकारी तसेच महापालिकेच्या सेवेतील काही अधिकारी प्रयत्नात होते. काहींनी पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ठाण्यातून आणि मंत्रालयातून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला होता, पण हा प्रयत्न फसला. एका अधिकाऱ्याने प्रतिनियुक्तीवर बदली होतानाच या पदासाठी सर्व प्रकारे ताकद लावली होती. मात्र त्यातही अपयश आले, तर काहींनी बारामतीतून वजन टाकण्याचा प्रयत्न केला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांची मुदत संपत आली असल्याने प्रशासकीय बदल करून कदम यांना जबाबदारी दिली आहे. राऊत यांना मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
- विक्रमकुमार,आयुक्त, पुणे महापालिका