Pune: पुणे तिथे सारेच उणे! उद्योगांची 'ही' मागणी कधी पूर्ण होणार?

Pune Auto Hub
Pune Auto HubTendernama

पुणे (Pune) : राज्याच्या दरडोई उत्पन्नात १८ टक्के वाटा पुणे शहराचा (Pune City) असला तरी उद्योग, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल, अशा प्रदर्शन केंद्राची (एक्झिबिशन सेंटर - Exhibition Center) पूर्तता करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. ऑटो हब (Auto Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात प्रदर्शन केंद्र निर्माण झाल्यास उद्योगांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Pune Auto Hub
Sambhajinagar : सरकारच्या चौकशीत यंत्रणा दोषी पण मंत्रालय पाठीशी

दिल्ली, चेन्नई, बंगळूर, हैदराबादमध्ये उद्योगांसाठी स्वतंत्र प्रदर्शन केंद्र आहे. कायमस्वरूपी स्टॉल्ससह प्रदर्शनी व्यासपीठ, प्रेक्षागृह, कॉन्फरन्स रूम, वाहनतळ, उपाहारगृह आदी सुविधा त्यात आहेत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योग - व्यावसायिकांसह लघुउद्योगही या सुविधांचा वापर करतात. तसेच विद्यार्थ्यांच्या सहलीही तेथे नियमितपणे येतात. मुंबई शहरातही तीन एक्‍झिबिशन सेंटर्स आहेत. मात्र, पुणे शहरात ही सुविधा उपलब्ध झालेली नाही.

पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ‘ऑटो क्लस्टर’ आहे. तेथे औद्योगिक प्रदर्शने होऊ शकतात. परंतु, त्यासाठी उद्योग - व्यावसायिकांना पुण्यातून पिंपरीत जावे लागते. पुण्याची लोकसंख्या सुमारे ४० लाख आहे. प्रदर्शनासाठी सर्वसामान्यांना तेथे पोचणे वाहतुकीच्या समस्येमुळे अवघड आहे.

त्यामुळे पुण्यातच प्रदर्शन केंद्र उभारावे, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघ सात वर्षांपासून करीत आहे. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार, गिरीश बापट, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला. परंतु, प्रदर्शन केंद्रासाठी पाऊल पुढे पडले नाही.

Pune Auto Hub
Nashik : 461 गावांपैकी केवळ 24 गावांसाठी स्मशानभूमीशेड मंजूर

पुण्यात प्रदर्शन केंद्र का हवे?
- पुणे शहराच्या चारही दिशांना १२ औद्योगिक वसाहती
- सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची मोठी संख्या
- सेवा क्षेत्राचाही मोठा विस्तार
- व्यावसायिकांचीही मोठी संख्या
- शहरात सुमारे सात लाख विद्यार्थी

प्रदर्शन केंद्रात काय हवे?
- पुरेशी जागा
- प्रदर्शनासाठी कायम स्वरूपी स्टॉल्सची रचना
- प्रेक्षागृह, कॉन्फरन्स रूम
- आधुनिक सुविधांचा समावेश
- उपाहारगृह, पार्किंग, मुबलक वीज पुरवठा आदी

सध्या पर्याय काय?
औद्योगिक प्रदर्शन आयोजित करायचे असल्यास मोकळी जागा भाडेतत्त्वावर घेऊन तेथे प्रदर्शनाचा ‘सेटअप’ उभारावा लागतो. त्यासाठी शेड अथवा मंडप उभारणी, तसेच प्रदर्शनासाठी पायाभूत सुविधा भाडेतत्त्वावर घेणे खर्चिक आहे. तसेच, तीन दिवसांच्या प्रदर्शनासाठी किमान १५ दिवस तयारी करावी लागते. त्यामुळे शहरात औद्योगिक प्रदर्शने अन्य शहरांच्या तुलनेत कमी होतात.

Pune Auto Hub
Maharashtra : मोफत गणवेशासाठी सरकार देणार 423 कोटी

पुणे शहराची वाढ आणि विस्तार वेगाने होत आहे. येथे उद्योगांचीही संख्या मोठी आहे. शहरासाठी प्रदर्शन केंद्राची आवश्यकता आहेच. त्यासाठी प्रशासनाने जागा दिली पाहिजे. सार्वजनिक - खासगी (पीपीपी) भागीदारी तत्त्वावर त्याची उभारणी करता येऊ शकते. प्रदर्शन केंद्रासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्याची पुण्याची क्षमता आहे.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रिकल्चर

पुण्यातून पिंपरी चिंचवडमध्ये प्रदर्शन आयोजित करणे अवघड आहे. उद्योग - व्यावसायिक गेले तरी, पुण्यातील नागरिकांना तेथे पोहचणे वाहतूक कोंडीमुळे अवघड आहे. पुण्याचा लौकिक, वाढ लक्षात घेता येथे या पूर्वीच एक्झिबिशन सेंटर व्हायला हवे होते. सरकारने फक्त जमीन दिली तर, पुण्यातील उद्योग - व्यावसायिक त्याची उभारणी करू शकतील.
- महेंद्र पितळीया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ

पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जागा निश्चित झालेली आहे. त्यासाठीचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे सादर झालेला आहे. हे केंद्र लवकर साकारावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पुण्यातही एक्झिबिशन सेंटर हवे, ही येथील उद्योग-व्यावसायिकांची मागणी राज्य सरकारला कळविलेली आहे.
- सदाशिव सुरवसे, विभागीय सहसंचालक, उद्योग विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com