
पुणे (Pune) : ‘पीएमपी’च्या (PMP) ताफ्यात नव्याने भाडे तत्त्वावरील ४०० पैकी ९४ बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने लगेच फेऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे.
९४ बसच्या वाहतुकीतून ४७० फेऱ्या वाढविल्या असून, यामुळे दैनंदिन सुमारे २४ हजार प्रवाशांची सोय झाली आहे. भोसरी, भेकराई नगर, शेवाळेवाडी, हडपसर व न. ता. वाडी या आगारातील बसच्या फेऱ्यांत वाढ झाली आहे.
‘पीएमपी’मध्ये बसचे आयुर्मान कमी होत असल्याने ३०० बस प्रवासी सेवेतून बाहेर झाल्या आहेत. याचा परिणाम प्रवासी सेवेवर होऊ नये याकरिता प्रशासनाने उपलब्ध बसच्या माध्यमातून बसच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन केले आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात ठेकेदारांच्या ९४ सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसदेखील लवकरच ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाने दिली आहे. शिवाय ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या बसदेखील लवकरच दाखल होणार आहेत.
या आगारांना मिळाली बस
(आगाराचे नाव....बस संख्या)
भोसरी ११
भेकराईनगर १६
शेवाळेवाडी २४
हडपसर ३३
न. ता. वाडी १०
एकूण बस संख्या ९४
तीन लाख प्रवाशांची सोय
भाडेतत्त्वावरील ४०० बस फेब्रुवारीत ‘पीएमपी’ला मिळणे अपेक्षित होते. मात्र बस कंपनीकडून उशीर झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. ४०० पैकी ९४ बस मिळाल्या. उर्वरित ३०६ बस एप्रिल महिन्यात प्राप्त होईल.
ठेकेदारांच्या बस नंतर ‘पीएमपी’ प्रशासन स्वतःच्या मालकीच्या २०० नवीन सीएनजी बस घेणार आहे. त्याचे कार्यादेश देखील दिला आहे. ४०० नव्या बसमुळे ‘पीएमपी’चा विस्कळित झालेला प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यातून दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यासाठी बसच्या वेळापत्रकाचा अभ्यास करण्यात आला. ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी असते त्या मार्गावर फेऱ्या वाढविल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. ज्या प्रमाणात बस उपलब्ध होतील त्या प्रमाणात बसच्या फेरीत वाढ केली जाईल.
- दीपा मुधोळ मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे