
पुणे (Pune) : लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या कामास प्रारंभ होणार तरी कधी, असा प्रश्न इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या २७ वर्षांपासून निवडणूक काळात गाजणाऱ्या या योजनेची प्रतीक्षा अद्याप थांबलेली नाही. टेंडर प्रक्रिया होऊनही नऊ महिने उलटले तरी संबंधित विभागाला मुहूर्त सापडला नाही.
योजनेचे काम सुरू होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. योजनेच्या मंजुरीसाठी २७ वर्षे शेतकऱ्यांनी वाट पाहिली आहे. मंजुरी होऊन टेंडर झाल्यानंतर नऊ महिने झाले तरी काम सुरू होत नसल्याने आता काम सुरू होण्याकरिता किती वाट पहावी लागणार, असा सवाल संतप्त शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
इंदापूर व बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी गावांसाठी शेतीच्या पाण्यासाठी ही योजना आखण्यात आली. त्यासाठी वेगवेगळ्या बैठका, सभा झाल्या. मात्र, ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी बाजूला पडली. मात्र, ३० डिसेंबर २०२२ रोजी या योजनेच्या कामाची टेंडर जाहीर झाले त्यानंतर १९ जानेवारीपर्यंत टेंडर मागवल्या होत्या. आता प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे .
तालुकानिहाय व गावनिहाय क्षेत्र पुढीलप्रमाणे (हेक्टरमध्ये)
इंदापूर तालुका : लामजेवाडी (२३८.१), शेटफळगढे (१३८.१) , म्हसोबाचीवाडी ((७५६.६), निरगुडे (६६५.२) लाकडी (७४०.७), निंबोडी (४५५.५) शिंदेवाडी (५४३.८) काझड (५१३.८) वायसेवाडी (१६३.६) धायगुडेवाडी अकोले (१२२.७) : (एकूण : ४ हजार ३३८ हेक्टर)
बारामती तालुका : कटफळ (७४४.८) सावळ (९०४.९) जैनकवाडी (४७७.७) पारवडी (२०८.८)कन्हेरी (२५७.८) काटेवाडी (२१६.१ गाडीखेल (१०२.४)
(एकूण २ हजार ९१३ हेक्टर)
योजनेचे स्वरूप
* योजनेसाठी उद्भव उजनी धरणाच्या जलाशयातून मौजे कुंभारगाव येथून पाणी उचलण्यात येणार. याकरिता ०.९० अब्ज घनफूट (२५.४८४ दलघमी) पाण्याची तरतूद.
* पहिल्या टप्प्यामध्ये ५०.१० मीटर व दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुक्रमे ५१.२० व ७३.२० मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे शेती सिंचनासाठी
* कुंभारगाव येथे योजनेचे पहिले तर शेटफळगढे येथे योजनेचे दुसरे पंपगृह केले जाणार आहे. कुंभरगाव येथे ७६५ अश्वशक्तीचे ४ तर शेटफळगढे येथे ५४० अश्वशक्तीचे २ तर ६४० अश्वशक्तीचे ३ विद्युत पंप बसविण्यात येणार.
* लामजेवाडी येथे योजनेचे पहिले वितरण कुंड व जैनकवाडी येथे योजनेचे दुसरे वितरण कुंड बांधले जाणार आहे.
टेंडर प्रक्रिया होऊनही काम का थांबले. हा प्रश्नच आम्हाला सध्या सतावत आहे. आमची सत्तावीस वर्षे योजना मंजुरीत गेली. अजून किती वाट पाहावी लागणार आहे.
- प्रवीण घोळवे, निंबोडी माजी सरपंच
कायमस्वरूपी दुष्काळी गावांतील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सर्व प्रक्रिया होऊन सुद्धा काम का सुरू होत नाही? प्रशासनाने हे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला कराव्यात.
- युवराज भोसले, शेतकरी, निरगुडे