पुणे (Pune) : पाटबंधारे विभागाने महापालिकेला २०२३-२४ या वर्षासाठी केवळ १२.८२ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. हा पाणी कोटा लोकसंख्येचा विचार करता अपुरा असल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी महापालिका प्रशासनातर्फे केली जाणार आहे.
पुणे महापालिकेने जुलै २०२३ ते जून २०२४ या वर्षासाठी २०.९० टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाला सादर केले होते. यामध्ये निवासी आणि ये-जा करणारी अशी एकूण ७२ लाख लोकसंख्या गृहीत, ३५ टक्के गळती धरून पाण्याची मागणी केली होती, परंतु पाटबंधारे विभागाने महापालिकेचे दावे फेटाळून लावला.
यामध्ये २३ गावे व १६ संस्थांना महापालिका नाही, तर पाटबंधारे विभाग पाणीपुरवठा करतो. तसेच पाणी गळती केवळ १३ टक्के असून वाढीव पाणी कोटा देण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिला असून १२.८२ टीएमसी पाणी मंजूर केले आहे.
आयुक्त विक्रम कुमार म्हणाले याबाबत, महापालिका समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करत आहे, पाणीपुरवठा योजनांचे कामही सुरू झालेले आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी दिले जात आहे. तसेच गळती १३ टक्के दाखविणे योग्य नाही. समान पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरही २० टक्के गळतीची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडे पत्र पाठवून फेरमान्यता घेऊन कोटा वाढविण्याची मागणी केली जाईल.