Pune : पुण्यात 'तो' नियम मोडणाऱ्यांना महापालिका देणार दणका!
पुणे (Pune) : पुणे शहरातील नदीपात्रामध्ये राडारोडा टाकण्याचे वाढते प्रकार थांबविण्यासाठी महापालिका (PMC) प्रशासन आता ठोस कारवाई करणार आहे.
नदीपात्रामध्ये राडारोडा टाकणाऱ्यांवर भरारी पथकामार्फत कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.
शहरातील मुळा, मुठा व राम नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत, तर उपनगरांमध्ये मोठमोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. संबंधित प्रकल्पांच्या ठिकाणी निघणारा राडारोडा सर्रासपणे नदीपात्रामध्ये आणून टाकला जात आहे.
त्यावर कडक कारवाई होण्याऐवजी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून तोंडदेखील कारवाई होत असल्याच्या प्रकारावरही समोर आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
शहरातील वन विभागाअंतर्गत येणाऱ्या जागा, टेकड्या, मैदाने, मुळा-मुठा, राम नदी यांसारख्या नद्यांचे पात्र, महापालिकेच्या आरक्षित जागा, बसस्थानकांच्या जागांचा परिसर, विकास आराखड्यातील रस्ते, महामार्ग अशा ठिकाणी राडारोडा टाकला जात आहे. बांधकामासह फर्निचर, हॉस्पिटल, हॉटेल्समधील राडारोड्याचाही त्यामध्ये समावेश आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी राडारोडा टाकण्याचे प्रकार घडत आहेत.
नदीपात्रात राडारोडा टाकण्याचा प्रकार गंभीर आहे. त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. महापालिकेच्या विशेष भरारी पथकाद्वारे नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून अधिकाधिक दंड वसूल केला जाईल.
- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका