पुणे (Pune) : महंमदवाडी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) क्रेडीट नोटच्या बदल्यात तीन रस्ते करण्यासाठी तब्बल ११८ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे.
या रस्त्यांमुळे या भागात १० लाख ५४ हजार ६०१ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र उपलब्ध होणार असल्याने तेथे अनेक मोठे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला आगामी २० वर्षांत एक हजार आठ कोटींचा खर्च येणार आहे. तसेच, बांधकाम शुल्क व मिळकतकरातून तीन हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे व्यवहार्यता अहवालात सुचविले आहे.
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात उपनगरांमध्ये रस्त्यांचे नियोजन केले आहे. पण जागा ताब्यात घेण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने ‘पीपीपी’ तत्त्वावर रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खराडी, बंडगार्डन, कल्याणीनगर, मुंढवा, बाणेर, सूस, म्हाळुंगे, बिबवेवाडी, गंगाधाम, कोंढवा, महंमदवाडी या भागातील १८ रस्ते व दोन पूल प्रस्तावित आहेत. त्यासाठी ७१७ कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील काही कामे यापूर्वीच सुरू झाली आहेत.
पथ विभागाने महंमदवाडीतील तीन रस्ते पीपीपी तत्त्वावर करण्यासाठी टेंडर काढले. महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेट सर्वे क्रमांक ४० ते ७६ मधून जाणारा ३० मीटर रुंद रस्त्यासाठी ६४ कोटी १२ लाख ३९ हजार ७४९ रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. दुसरा रस्ता महंमदवाडी सर्वे क्रमांक १ ते ४, ९६, ५७ ते ५९ मधून जाणारा २४ मीटरचा असून, यासाठी ३९ कोटी तीन लाख ४२ हजार ५१ रुपये खर्च येणार आहे. तिसरा रस्ता १८ मीटर रुंदीचा असून, तो महंमदवाडी सर्वे क्रमांक १२, १३, ३०, ३२, ५७ मधून जाणार आहे. यासाठी १४ कोटी ६० लाख ६७ हजार ५८५ रुपये खर्च अपेक्षीत आहे.
या तिन्ही रस्त्यांसाठी ११७ कोटी ७६ लाख ४९ हजार ३८५ रुपये खर्च आहे. ही रक्कम संबंधित ठेकेदाराने खर्च करून, त्याच्या क्रेडीट नोट मिळकतकर, बांधकाम विकसनशुल्क यांसह इतर मार्गांनी खर्च करून तो वसूल करायचा आहे. या रस्त्यासाठीच्या जागा ताब्यात घेण्यासाठी ठेकेदारालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. महापालिकेने तयार केलेल्या व्यवहार्यता अहवालात या भागात पुढील २० वर्षांत केला जाणारा संभावित खर्च, उत्पन्न आणि होणाऱ्या बांधकामाबाबत आकडेवारी नमूद केली आहे.
अन्यथा टँकर लाँबीचेच फावणार
महंमदवाडीतील एनआयबीएम ॲनेक्स सी भागातील रस्त्यांमुळे हा भाग १०-१२ वर्षांत मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. पण येथे महापालिकेतर्फे अत्यंत कमी पाणी दिले जात असल्याने, स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने टँकर लॉबी मालामाल झाली आहे. त्याचपद्धतीने महंमदवाडीतील हे तीन रस्ते विकसित झाल्यास येथे मोकळ्या जागांवर मोठे बांधकाम प्रकल्प प्रस्तावित होऊन नागरी वस्ती वाढणार आहे.
रस्ते व इमारती विकसित होत असतानाच महापालिकेने पाणी पुरवठ्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात नागरिकांना टँकर लॉबीवरच लाखो रुपये खर्च करावे लागतील.
तीन रस्त्यांचे आगामी २० वर्षांचे गणित
१) महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेट
- रुंदी ः ३० मीटर
- लांबी ः २२०० मीटर
- विकसित होणारा भाग ः ८,०४,४३६ चौरस मीटर
- उत्पन्न ः २२०४ कोटी रुपये
- पायाभूत सुविधांचा खर्च ः ७५१ कोटी रुपये
- महापालिकेचा फायदा ः १४५४ कोटी रुपये
२) महंमदवाडी सर्वे क्रमांक १ ते ४, ९६, ५७ ते ५९
- रुंदी ः २४ मीटर
- लांबी ः १५२४ मीटर
- विकसित होणारा भाग ः १,७३,४२० चौरस मीटर
- उत्पन्न ः ५९३ कोटी रुपये
- पायाभूत सुविधांचा खर्च ः १७७ कोटी रुपये
- महापालिकेचा फायदा ः ४१५ कोटी रुपये
३) महंमदवाडी सर्वे क्रमांक १२, १३, ३०, ३२, ५७
- रुंदी ः १८ मीटर
- लांबी ः ९७३ मीटर
- विकसित होणारा भाग ः ७६,७४५ चौरस मीटर
- उत्पन्न ः २६९ कोटी रुपये
- पायाभूत सुविधांचा खर्च ः ८० कोटी रुपये
- महापालिकेचा फायदा ः १८९ कोटी रुपये
महापालिका प्रशासनाने पीपीपी तत्त्वावर रस्ते विकसित करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याअंतर्गत महंमदवाडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तीन रस्त्यांसाठी टेंडर काढले आहे.
- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग