Pune : खोटी माहिती देणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याला दणका; थेट निलंबनाची कारवाई
पुणे (Pune) : पाषाण रस्त्यावर पाणी पुरवठ्याच्या नावाखाली खासगी कंपनीला खोदाईसाठी (Road Digging In Pune) परवानगी देण्याचा उद्योग एका कनिष्ठ अभियंत्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. धक्कादायक म्हणजे रस्ते खोदाईबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी विचारणा केल्यानंतर या कनिष्ठ अभियंत्याने खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने त्यास निलंबित करण्यात आले आहे.
पुणे शहरातील रस्ते विविध कारणामुळे खोदल्याने गेल्या तीन, चार वर्षांपासून पुणेकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कारभारावर टीका झाल्याने गेल्या वर्षभरापासून रस्ते चांगले करण्यासाठी प्रशासनाने काम सुरू केले आहे. यामध्ये रस्ता डांबरीकरण केल्यानंतर तो पुन्हा लगेच खोदला जाऊ नये यासाठी पथ विभागासोबत पाणी पुरवठा, विद्युत यासह इतर विभागांशी समन्वय ठेवला जात आहे.
रस्ता डांबरीकरण करण्यापूर्वीच इतर विभागांची कामे करून घेण्यावर भर आहे. यासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून असतानाही काही अधिकारी निष्काळजीपणे काम करत असल्याने रस्ते खराब होत आहेत.
काही आठवड्यांपूर्वी अभिमानश्री सोसायटी ते पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. हे काम करण्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या जलवाहिनीचे कामही करून घेतले होते. त्यामुळे हा रस्ता लगेच खोदण्याची गरज पडणार नव्हती.
दरम्यान, ढाकणे हे औंध, बाणेर, पाषाण भागातील कामांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना अभिमानश्री सोसायटीकडून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरणानंतर खोदकाम झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडे चौकशी केली असता पाणी पुरवठा विभागाला परवानगी दिली असल्याचे सांगितले.
यावर ढाकणे यांनी या ठिकाणी मीच जलवाहिनीचे काम करून घेतले आहे, आता कुठले काम आहे? त्याची परवानगी दाखवा, असा प्रतिप्रश्न संबंधित अभियंत्याला करून चांगलेच फैलावर घेतले. त्यावेळी या ठिकाणी खासगी कंपनीकडून खोदकाम सुरू असल्याचे समोर आले. या कर्मचाऱ्याचा खोटारडेपणा समोर आल्याने त्यास ढाकणे यांनी त्वरित निलंबित केले.
पुणे शहरातील रस्ते चांगले करण्याचा आमचा प्रयत्न असताना पथ विभागातील काही अधिकारी कामात निष्काळजीपणे काम करत आहेत. परस्पर चुकीच्या पद्धतीने परवानग्या दिल्या जात आहेत. तसेच चुकीची माहितीही दिली जात असल्याने एका कनिष्ठ अभियंत्यास निलंबित केले आहेत. तर कात्रज कोंढवा रस्त्यावरील काम काही नागरिकांनी अडवूनही त्याची माहिती न दिल्यास एका अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. जे कर्मचारी, अधिकारी कामात सुधारणा करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

