Pune: 3 उड्डाणपूल अन् 1 समतल विलगक असूनही शिवाजीनगरमधील कोंडी का फुटेना?
पुणे (Pune): शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने साखर संकुल ते जुना मुंबई-पुणे रस्ता या दरम्यान उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवाजीनगर येथे सीओईपी चौक, पाटील इस्टेट, शेतकी महाविद्यालय येथे उड्डाणपूल आहेत, समतल विलगक आहे, त्यात आता आणखी एका उड्डाणपुलाची भर पडणार आहे.
शिवाजीनगर व वाकडेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जाणवत असून, विशेषतः गोपाळकृष्ण गोखले रस्ता, नरवीर तानाजीवाडी, वाकडेवाडी मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. साखर संकुल ते जुना मुंबई- पुणे महामार्ग या दरम्यान अरुंद भुयारी मार्ग आहे, त्याचा वापर मोठ्या वाहनांना करता येत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने साखर संकुलपासून रेल्वे मार्ग ओलांडून थेट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेने जाणारा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर उड्डाण पुलाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल.
असा असेल संभाव्य उड्डाण पूल
- एक मार्गिका वाकडेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी
- दुसरी मार्गिका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी
- उड्डाण पुलामुळे शिवाजीनगर बस स्थानकातून सुटणाऱ्या बस वाकडेवाडी व संगमवाडीकडे जाऊ शकतील, त्यांना संचेती रुग्णालयाकडे जाण्याची गरज पडणार नाही