Ajit Pawar: 'तो' प्रकल्प तातडीने मार्गी लावा; अजितदादांनी काय दिले आश्वासन?

Ajit Pawar
Ajit PawarTendernama
Published on

मुंबई (Mumbai): अणुशक्तीनगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असलेल्या १०,३३३.९१ चौ.मी. क्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामास गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
मुंबई महापालिकेत दलालांचे राज्य; 'त्या' टेंडरमध्ये कोणी खाल्ला मलिदा?

अणुशक्तीनगर येथे म्युन्सिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे, तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुंबई शहरात क्रीडापटूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व प्रशिक्षण देण्यास हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महत्वाचे ठरणार आहे. संबंधित भूखंड हा म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असल्याने, यापूर्वी त्या जागेसंदर्भात दि चिल्ड्रन एड सोसायटीसोबत असलेले भाडेकरार संपुष्टात आणावे. यासंदर्भात महसूल विभागाशी समन्वय साधून हा भूखंड महानगरपालिकेकडे क्रीडा संकुल उभारणीसाठी हस्तांतरित करावा.

तसेच या जागेवर अतिक्रमण असल्यास ते निष्कासित करण्यात यावे. या क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसह क्रीडा संकुल उभारावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar
वादग्रस्त अ‍ॅम्ब्युलन्स टेंडरफेम 'सुमित फॅसिलिटीज'चा संचालक झारखंडमध्ये गजाआड

मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय

मौजे अनिक, चेंबूर येथे शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासंदर्भात अल्पसंख्याक विकास विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी पवार यांनी दिले. महाविद्यालय निर्मितीनंतर आवश्यक शैक्षणिक पदांची निर्मिती, पदभरती, देखभाल दुरूस्ती याचीही तरतूद करण्यात यावी. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे असलेले अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे. मान्यता असलेल्या ११ पदांची भरती तत्काळ करावी.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना राबविण्यात यावी. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दरवर्षी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी विद्यार्थ्यांची मर्यादा ठरवावी, असेही पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
पीएमपीच्या बस थांब्यांना 3 वर्षांनंतरही मुहूर्त का लागेना?

अल्पसंख्याक समाजातील मुलांना उच्च व परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे, क्रीडा आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ग.पी. मगदूम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com