
पुणे (Pune) : ‘पीएमपी’ प्रशासनाने आपल्या चालकांना ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ४५० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे भविष्यात ठेकेदारांच्या ई-बस चालकांनी संप केला तरी, पीएमपीचे चालक ई बसचे स्टिअरिंग आपल्या हाती घेऊ शकतात. परिणामी, ‘पीएमपी’च्या बसची वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.
‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण २ हजार ८९ बस आहेत. त्यात ९९१ बस या ‘पीएमपी’च्या मालकीच्या आहेत. तर १ हजार ९८ बस या ठेकेदारांच्या आहेत. यात ६४० बस या ‘सीएनजी’वरील आहेत. तर, ४५८ ई-बस आहेत. २५ ऑगस्टला काही ठेकेदारांनी संप केला. त्यामुळे ई-बसच्या वाहतुकीला ब्रेक लागला होता.
प्रवाशांना फटका बसू नये म्हणून पीएमपी प्रशासनाने नियोजन करून अतिरिक्त गाड्या रस्त्यावर आणल्या. काही चालकांनी ई-बस चालविण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, चालविण्यात खूप अडचणी आल्या.
यानंतर पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी ‘पीएमपी’च्या चालकांनाही ई-बस चालविण्याचा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांपासून चालकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ४५० चालकांना प्रशिक्षण दिल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.