Pune News पुणे : वाघोलीमधील (Wagholi) वाघेश्वरनगर दगडखाण कामगार वस्तीजवळ कचरा डेपो उभारल्याने पर्यावरणाची हानी झाल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) पुणे महापालिकेला (PMC) एक कोटी ७९ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वाघेश्वरनगर येथील दगडखाण कामगारांची वस्ती आहे. वस्तीजवळ २०१५ पासून कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे सुमारे दोन-तीन एकर जागेवर कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. कचऱ्यामुळे कामगार वस्तीत दुर्गंधी पसरली असून डास, कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
या वस्तीत कचरा टाकू नका, कचऱ्याचा डेपो दुसरीकडे हलवावा, या मागणीसाठी स्थानिकांकडून वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल न घेतल्यामुळे २०१६ मध्ये दगडखाण कामगार परिषदेच्यावतीने संतुलन संस्थेने मुख्य सचिव, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, वाघोली ग्रामपंचायतीला नोटिसाही देण्यात आल्या. मात्र, या समस्येची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतुलन संस्थेने २०२० मध्ये ‘एनजीटी’त दावा दाखल केला.
याप्रकरणी ‘एनजीटी’ने पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हवेलीचे तहसीलदार अशी तिघांची संयुक्त समिती स्थापन केली. या समितीने अहवाल सादर केला. त्याआधारे कचरा डेपोमुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीची भरपाई रक्कम ठरविण्यात आली.
दरम्यानच्या काळात ३० जून २०२१ मध्ये वाघोलीगाव पुणे महापालिका हद्दीत विलीन झाले. त्यामुळे पुणे महापालिकेने नुकसान भरपाई म्हणून एक कोटी ७९ लाख १० हजार रुपये दंड भरावा, तसेच वाघेश्वरनगर येथे कचरा टाकणे बंद करावे, असा आदेश ‘एनजीटी’ने दिला, अशी माहिती दगडखाण कामगार परिषदेचे अँड. बस्तू रेगे यांनी दिली.
डेपोत पुन्हा कचरा टाकू नका...
डेपोत पुन्हा कचरा न टाकण्याचा आदेशही एनजीटीने दिला आहे. निकाल झाल्यापासून दंडाची रक्कम दोन महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.