पुणे (Pune) : शहरातील शनिवारवाडा, लाल महल, महात्मा फुले मंडई, विश्रामबाग वाडा हा परिसर ‘हेरिटेज’ मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्याला ऐतिहासिक रूप यावे यासाठी डेकोरेटिव्ह पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तब्बल ८६ लाख ६६ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. हे काम चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षीत होते. पण सहा महिने उलटून गेले तरीही खांब बसविण्यासाठी केवळ पाया घेतला आहे, पथदिवे अद्याप गायबच असल्याचे समोर आले आहे. हे काम एप्रिल महिन्यापासून ठप्प आहे.
पुण्यातील पेठांमध्ये शिवकालीन, पेशवेकालीन वास्तू आहेत. पुण्याचा इतिहास या वास्तूतून उलगडता यावा, पुण्याचे वैभव पर्यटकांना समजून घेता यावे, यासाठी महापालिकेने ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम सुरू केला आहे. पण या वास्तूंच्या परिसरातील रस्ते, पादचारी मार्ग, रस्ते परिसरातील स्वच्छता याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर भर देण्याऐवजी सुशोभिकरणावर अधिक खर्च केला जात आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात पथदिव्यांचे खांब हे या वास्तूंना साजेसे असावेत, यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून यासाठी ८६ लाख ६६ हजार रुपयांची निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाने निविदा प्रक्रिया राबविली. फेब्रुवारी महिन्यात ठेकेदाराला कार्यादेश दिले. मार्च महिन्यात ठेकेदाराने डेकोरेटिव्ह खांब बसविण्यासाठी सिमेंट काँक्रिटचा पाया तयार करून घेतला आहे. यामध्ये शनिवारवाड्याची बाजीराव रस्त्याची बाजू, शिवाजी रस्ता, देसाई महाविद्यालयाच्या समोरचा रस्ता, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर, विश्रामबाग वाडा, मंडई, तुळशीबाग, अप्पा बळवंत चौक, ओंकारेश्वर मंदिर परिसर आदी भागांत हे काम झाले. पण त्यानंतरचे काम झालेले नसल्याने काही ठिकाणी पायाची तोडफोड झाली आहे. एप्रिल महिन्यापासून हे काम ठप्प का आहे? याबाबत या कामाची जबाबदारी असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांकडे चौकशी केली असता खांब तयार करून घेण्याचे काम सुरू आहे, असे सांगून वेळ मारून नेण्यात आली.
चार महिन्यांची मुदत संपली
हे काम करण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराला २८ फेब्रुवारी रोजी कार्यादेश दिले. हे काम चार महिन्यांत म्हणजे २८ जून पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नसल्याने दोन वेळा त्यास स्मरणपत्र पाठवले असले तरी ठेकेदाराने दाद दिलेली नाही. या कामासाठी केवळ पाया घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. विद्युत वाहिनी टाकणे, फिटिंग्ज बसवणे अशी महत्त्वाची कामे शिल्लक आहेत.
जिल्हा नियोजन मंडळाकडून डेकोरेटिव्ह खांब बसविण्यासाठी निधी आला आहे. हे काम वेळेत पूर्ण करावे, यासाठी ठेकेदाराला दोन वेळा पत्रे पाठवली आहेत. खांब तयार करून घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच काम पूर्ण केले जाईल.
- भाग्यश्री देशपांडे, कार्यकारी अभियंता