Pune : मागच्या वर्षीची चूक महापालिका यंदा सुधारणार; 'ते' टेंडर अखेर रद्द
पुणे (Pune) : कोरोनाच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध असल्याने महापालिकेने (PMC) फिरत्या विसर्जन हौदांचा उपक्रम राबविला होता. कोरोना संपल्यानंतर दोन वर्षे यासाठी पुन्हा टेंडर (Tender) काढण्यात आले, पण त्याचा फायदा पुणेकरांपेक्षा ठेकेदारालाच (Contractor) जास्त होत असल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेने यंदा फिरत्या हौदांसाठी टेंडर न काढण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जनासाठी पुरेशा प्रमाणात हौद, टाक्यांची व्यवस्था केली जाणार आहे.
२०२१ मध्ये कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आली होती. घरोघरी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर नागरिकांनी विसर्जनासाठी गर्दी करू नये यासाठी फिरत्या विसर्जन हौदाची संकल्पना राबविण्यात आली.
यामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी १० या प्रमाणे १५० फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. २०२२ मध्येही ही योजना राबविण्यात आली. पण फिरते हौद नागरिकांना उपलब्ध होत नसल्याने ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. कोणत्या भागात फिरते हौद असणार? किती वेळ असणार? याची माहिती नागरिकांना मिळाली नाही. त्यामुळे या टेंडरवर होणाऱ्या खर्चावर स्वयंसेवी संस्थानी टीका केली.
२०२३ मध्ये कोरोनाचा धोका नसल्याने निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तरीही महापालिकेने फिरत्या हौदांसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचे टेंडर काढले. शहरात एकूण पाच लाख ६१ हजार ४२८ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यामध्ये फिरत्या हौदात केवळ ५९ हजार १२६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. २०२१, २०२२ च्या तुलनेत हे प्रमाण घटले होते. त्यामुळे आता २०२४ मध्ये फिरत्या विसर्जन हौदांसाठी टेंडर काढले जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना गणेश मूर्त विसर्जन करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत लोखंडी टाक्या, घाटांवर हौदाची व्यवस्था केली जाईल. तसेच मूर्ती दान संकलन केंद्रही सुरू केले जाणार आहेत. यंदा फिरत्या विसर्जन हौदांसाठी टेंडर काढले जाणार नाही. मूर्ती विसर्जनासाठी शहरात पुरेशी व्यवस्था केली जाईल.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
हौदात विसर्जनाची टक्केवारी
२०२१ - ३२ टक्के
२०२२ - १३ टक्के
२०२३ - १० टक्के
२०२३ मधील विसर्जनाची आकडेवारी
- बांधलेल्या हौदांतील विसर्जन- ९९९२१
- लोखंडी टाक्यांतील विसर्जन - २९१५६०
- संकलित केलेल्या मूर्ती - ११०८२१
- फिरत्या हौदांतील विसर्जन - ५९,१२६
- एकूण - ५,६१,४२८