Pune : लोहगाव विमानतळाला जोडणाऱ्या ‘व्हीआयपी’ रस्त्याचे होणार रुंदीकरण

Road
RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : लोहगाव विमानतळाला जोडणाऱ्या आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास वापरल्या जाणाऱ्या ‘व्हीआयपी’ रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी संरक्षण विभागाने या रस्त्याची दोन्ही बाजूची मिळून सुमारे सहा मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी महापालिकेने काम सुरू केले आहे. विधानसभा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्याने सध्या या ठिकाणी वेगाने काम सुरू आहे.

Road
Mumbai : बांधकाम कामगारांच्या योजनांचा मार्ग मोकळा; हायकोर्टाच्या आदेशाने ‘तो’ निर्णय रद्द

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. तसेच लोहगाव विमानतळाच्या परिसरातही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. लोहगाव विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढत असल्याने या भागात नवे रस्ते करणे, अस्तित्वातील रस्ते मोठे करणे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहे; पण अद्याप त्यास निधी मिळालेला नाही.

संरक्षण विभागाकडे पाठपुरावा

विमानतळ ते वैकफील्ड चौक हा सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता ‘व्हीआयपी’ मार्ग म्हणून ओळखला जातो. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह अन्य नेते व इतर महत्त्वाच्या व्यक्ती पुण्यात आल्यानंतर या मार्गाचा वापर करून नगर रस्त्यावर येतात. सध्या हा रस्ता सहा मीटर रुंदीचा आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुमारे तीन मीटर इतकी मोकळी जागा असून, त्यानंतर दोन्ही बाजूने उंच सीमा भिंत आहे. ही मोकळी जागा महापालिकेला दिल्यास रस्ता रुंद होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. पंतप्रधान मोदी हे विधानसभेच्या प्रचारासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे या रस्त्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी केली. त्यास मान्यता देण्यात आली आहे.

Road
Pune : सारसबाग चौपाटी पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यास महापालिकेकडून चालढकल

दोन्ही बाजूला स्वच्छता सुरू

‘व्हीआयपी’ मार्गाच्या या दोन्ही बाजूने गवत वाढले असून, तेथे मोठ्या प्रमाणात दगड-गोटे पडलेले आहेत. तेथे रात्रीच्या वेळी राडारोडा टाकण्यात येत असल्याने हा परिसर अस्वच्छ दिसत आहे. महापालिकेला काम करण्याची मान्यता मिळाल्यानंतर रस्त्याच्या हा भाग समपातळीत आणण्‍यासाठी दबाई केली जात आहे. दगड-गोटे उचलण्याचे, गवत काढण्याचे काम सुरू झाले आहे. हा कच्चा रस्ता समपातळीत आल्यास दैनंदिन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

दोन्ही बाजूने तीन मीटर जागा

‘व्हीआयपी’ रस्ता सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन मीटर जागा मोकळी आहे. सध्या सहा मीटरचा रस्ता आहे. ही जागा मिळाल्याने हा रस्ता आणखी सहा मीटर मोठा होऊ शकतो.

व्हीआयपी रस्त्याच्या बाजूची जागा संरक्षण विभागाने महापालिकेला ताब्यात द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यास मंजुरी मिळाली असल्याने महापालिकेने काम सुरू केले आहे. सध्या गवत, माती, दगड काढण्याचे काम सुरू असून, हा रस्ता समपातळीमध्ये आणल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होईल. काही कालावधीनंतर तेथे डांबरीकरण केले जाईल.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com