
पुणे (Pune) : अडचणीच्या ठिकाणी असलेल्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक स्पायडर मशिन वापरली जाणार आहेत. त्यासाठी तीन कोटी ५३ लाख ४२ ८२७ हजार रुपयांच्या पाच टेंडरला सोमवारी (ता. ३०) पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईसाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय टेंडर काढले जातात. अनेक नाल्यांपाशी जेसीबी किंवा पोकलेन ही वाहने पोहचू शकत नाहीत. त्यामुळे स्पायडर मशिन वापरली जाणार आहेत. पुणे शहरातून सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे नाले वाहतात. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा, राडारोडा टाकला जातो. त्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे नाल्याची रुंदी कमी होते. त्यामुळे नाल्याला पूर आल्यानंतर लगतच्या वस्ती, सोसायट्यांमध्ये पाणी जाऊन नुकसान होते. त्यामुळे नालेसफाईसाठी टेंडर काढले जातात.
एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत नालेसफाई केली जाते. या टेंडरची मुदत सहा महिन्यांसाठी असली तरी तीन महिनेच काम केले जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर या टेंडरचा काही उपयोग करून घेतला जात नाही. असे असताना महापालिकेच्या मलनिःसारण विभागाने स्पायडर मशिनसाठी परिमंडळ निहाय टेंडर काढले आहे.अनेक ठिकाणी नाल्यांची खोली जास्त असल्याने व आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने मनुष्यबळ लावून काम करता येत नाही. त्यामुळे स्पायडर मशिन लावून सफाई केली जाणार आहे. परिमंडळ एकसाठी ७१ लाख ५८ हजार ७३१, परिमंडळ दोनसाठी ७१ लाख ५८ हजार ७३१, परिमंडळ तीनसाठी ७१ लाख ५८ हजार ९८, परिमंडळ चारसाठी ६७ लाख ८ हजार ६९३ आणि परिमंडळ पाचसाठी ७१ लाख ५८ हजार ५७४ रुपयांच्या टेंडरला मान्यता देण्यात आली आहे, असे अधिक्षक अभियंता संतोष तांदळे आणि दिनकर गोजारे यांनी सांगितले.