
पुणे (Pune) : महामेट्रोतर्फे मेट्रोच्या (Metro) विस्तारीकरणाचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केल्यानंतर त्यामध्ये खडकवासला ते खराडी, एसएनडीटी ते माणिकबाग आणि निओ मेट्रो यासाठी १५०० कोटी रुपये महापालिकेचे दायित्व दाखविण्यात आले आहे. पण शहरात नदीकाठ सुधार, जायका यासह अनेक मोठे प्रकल्प सुरू असल्याने मेट्रोच्या कामाचा भार महापालिकेवर टाकू नये. त्यादृष्टीने खर्चाचे नियोजन करावे, असे पत्र महामेट्रोला पाठविले आहे.
पुणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या आता जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार महामेट्रोने चार मार्गांचा डीपीआर तयार केला.
असा आहे दुसरा टप्पा
- खडकवासला ते हडपसर-खराडी २५.८६ किलोमीटर
- एसएनडीटी ते वारजे-माणिकबाग ६.१२ किलोमीटर
- एचसीएमटीआर निओ मेट्रो ४३.८४ किलोमीटर
- वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली १२.८३ किलोमीटर
- एकूण ८८.३७ किलोमीटरचा मार्ग
असे आहे खर्चाचे गणित
- प्रकल्पासाठी १६ हजार ६०७ कोटी रुपयांचा खर्च
- महापालिकेचा हिस्सा १६०० कोटी रुपये
- वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या मार्गाचा भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी ९१ कोटी ५७ लाख रुपयांचा खर्च कमी करून महापालिकेकडे केवळ २४ लाख रुपयांची मागणी
- उर्वरित मार्गांबद्दल मेट्रोने अद्याप स्पष्टता दिलेली नाही
अशी आहे स्थिती
- खडकवासला ते हडपसर-खराडी आणि एसएनटीडी ते वारजे-माणिकबाग या मार्गासाठी महामेट्रोकडून महापालिकेकडे १३३१ कोटी ९५ लाख आणि निओ मेट्रोसाठी १५८ कोटी ८५ लाख रुपयांची मागणी
- ‘डीपीआर’वर चर्चा करून त्यात काही सुधारणा करण्यास सांगितल्याने हा प्रस्ताव पुन्हा एकदा महामेट्रोकडे
- सुधारित प्रस्ताव अद्याप आलेला नसताना महापालिकेकडून खर्चाचा बोजा कमी करण्याची मागणी
- केंद्र सरकारने २०२० मध्ये मंजूर केलेल्या मेट्रो कायद्यात मेट्रोसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा असलेला १० टक्के हिस्सा काढून टाकल्याने याचा खर्च महामेट्रोने करावी अशी महापालिकेची भूमिका
हे आहेत मोठे प्रकल्प
१) महापालिकेतर्फे शहरात नदी काठ सुधार प्रकल्प ४ हजार ७०० कोटी
२) मुळामुठा पुनर्जीवन प्रकल्प (जायका) १४५० कोटी
३) वैद्यकीय महाविद्यालय इमारत, वसतीगृह २५० कोटी,
४) विविध उड्डाणपूल सुमारे १५० कोटी