Pune : उरुळी देवाची कचरा डेपोतील बायोमायनिंग टेंडर महापालिकेला पडले महागात
पुणे (Pune) : फुरसुंगी उरुळी देवाची डेपोतील कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काढलेले टेंडर चांगलेच महागात पडत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने टीपिंग शुल्कासाठी (कचरा वाहतुकीचा खर्च) निश्चित केलेल्या दरापेक्षा पात्र ठेकेदाराने १३५ रुपये जादा दर लावला आहे. त्यामुळे १०० टन कचऱ्याचे बायोमानिंग करताना तब्बल १३ कोटी ५० लाख रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहेत. हा दर अव्वाचा सव्वा असल्याने महापालिकेने ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी पत्र पाठवले आहे.
महापालिकेने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोतील ५३ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यास सुरुवात केली आहे. २०१६, २०२१ मध्ये टेंडर काढून आत्तापर्यंत २१ लाख मेट्रीक टनाचे बायोमायनिंग झाले आहे. त्यानंतर आता १० लाख मेट्रीक टन कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठी टेंडर काढले आहे, त्यासाठी टीपिंग शुल्काची रक्कम ८४४ रुपये प्रतिटन इतकी निश्चित केली आहे. हे टेंडर काढताना दोन लाख टन ‘आरडीएफ’ची विल्हेवाट लावण्याचा अनुभव अनिवार्य करण्याची अट प्रशासनाने टाकली. त्यामुळे ठराविक ठेकेदारच पात्र ठरतील, महापालिकेचे नुकसान होईल, त्यामुळे ही अट रद्द करा, जास्त स्पर्धा झाल्यास महापालिकेचा आर्थिक फायदा होईल, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. पण या तक्रारींना बेदखल करत अट कायम ठेवली. त्यामुळे अवघे दोनच ठेकेदार पात्र झाले. हे दोन्ही ठेकेदार २०२२च्या टेंडरही पात्र ठरले होते. भूमी ग्रीन एनर्जी कंपनीने सर्वांत कमी ९७९ रुपये प्रतिटन दर देऊन यंदाही टेंडर मिळवण्याची तयारी केली आहे. पण हा दर महापालिकेच्या दरापेक्षा प्रतिटन १३५ रुपयांनी जास्त आहे. बाजारभावापेक्षा हा दर खूप जास्त आहे. अव्वाच्या सव्वा दर लावल्याने पुणे महापालिका प्रशासनाने त्यावर हरकत घेतली आहे. हा खर्च महापालिकेला परवडणारा नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टेंडरमधील दराचे पृथःकरण सादर करावे आणि दर कमी करण्याबाबत सात दिवसांत कळवावे, असे पत्र महापालिकेने दिले आहे. भूमी ग्रीन कंपनीचा सांगली येथे वीज निर्मिती प्रकल्प असून, त्यामध्ये इंधन म्हणून आरडीएफचा वापर करून विल्हेवाट लावली जाणार आहे.
बोलके आकडे
१०० टन
दीड वर्षात कचऱ्याचे करावयाचे बायोमायनिंग
९७९ रुपये प्रतिटन
टेंडरमधील सर्वांत कमी दर
१०० टनांसाठी
१३ कोटी ५० लाख रुपये जास्त मोजावे लागणार
इतर महापालिकांमधील दर (प्रतिटन)
४२० रुपये
सांगली
६१२ रुपये
लखनौ
तीन टेंडरमधील ठेकेदार आणि टीपिंग शुल्क
१) २०१८
भूमी ग्रीन एनर्जी - ६४७ रुपये (काम मिळाले)
सेव्ह एन्व्हायरमेंट - ६७८ रुपये
एसएमएस लिमिटेड - ९३६ रुपये
२) २०२२
भूमी ग्रीन एनर्जी - ८४४ रुपये (काम मिळाले)
झिग्मा ग्लोबल एन्व्हायरोन सोल्यूशन प्रा. लि. - ९२० रुपये
३) २०२४
भूमी ग्रीन एनर्जी -९७९ रुपये (काम मिळण्याची शक्यता)
झिग्मा ग्लोबल एन्व्हायरोन सोल्यूशन प्रा. लि. -१२२० रुपये