
पुणे (Pune) : पावसाने उघडीप दिल्याने शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला गती येणे अपेक्षित असताना महापालिकेचा येरवडा येथील हॉटमिक्स प्लांट बंद पडला. त्यामुळे दिवसभर खड्डे बुजविण्याचे काम ठप्प झाले.
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिका आयुक्तांनी ‘शहरातील रस्ते त्वरित खड्डेमुक्त करा’ असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. गेले दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शहरातील खड्डे बुजविण्यासाठी पथ विभागाने तयारी केली आहे. मात्र, बुधवारी सकाळी हॉटमिक्स प्लांटमधील बेअरिंग खराब झाल्याने प्लांट बंद पडला. त्यामुळे पथ विभाग, क्षेत्रीय कार्यालयाच्या अभियंत्यांकडून खडी मिश्रित डांबराची मागणी असताना त्यांना हा माल पुरविता आला नाही. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. पथ विभागाने तूर्त कोल्डमिक्सचा वापर करून खड्डे बुजविण्याचे प्रयत्न सुरू केला आहेत. तसेच काही ठेकेदारांकडून हॉटमिक्स डांबर मिळविण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
गेल्या आठवड्यातही प्लांट बंद
गेल्या आठवड्यात विद्युत पुरवठा करणारी केबल खराब झाल्याने हा प्लांट दोन दिवस बंद होता. आता बेअरिंग खराब झाल्याने हा प्लांट दोन दिवस बंद राहणार आहे.
येरवड्यातील हॉटमिक्स प्लांटमधील बेअरिंग खराब झाल्याने खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. रात्रभर काम करून हा प्लांट त्वरित सुरू करा, असे आदेश दिले आहेत. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था केली जाईल.
- साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग