Pune : कोथरूड परिसरात अनधिकृत फ्लेक्सचे पेव; महापालिकेचे...
पुणे (Pune) : कोथरूड परिसरात नळस्टॅाप ते चांदणी चौकदरम्यान चौकाचौकात अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे कोथरूडच्या विद्रूपीकरतात भर पडली आहे. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक असे विविध प्रकारचे फ्लेक्स लावल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
मेट्रोच्या खांबावर फ्लेक्स लावण्यास बंदी असताना देखील शेकडो फ्लेक्स खांबावर लावण्यात आलेत. अनेक ठिकाणी पाऊस, वाऱ्याने फ्लेक्स फाटून रस्त्यावर पडलेले आहेत. याकडे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष होत असून कार्यवाही होताना दिसत नाही. वनाज कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, कोथरूड गावठाण, नळस्टॅाप ते वनाज मेट्रोच्या खांबावर, डीपी रस्ता, जय भवानीनगर ते महाराजा कॉम्प्लेक्स, भुसारी कॉलनी, अण्णा भाऊ साठे चौक, कोथरूड पोलिस स्टेशन, सागर कॉलनी चौक, आझाद नगर, सुतार हॉस्पिटल, गुजरात कॉलनी, शांतिबन सोसायटी चौक या परिसरात सर्वाधिक फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
कोथरूड परिसरात अनधिकृत फ्लेक्स लावून परिसराचे विद्रूपीकरण करण्याची स्पर्धा सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांचा अशा विद्रूपीकरणाला विरोध असून राजकीय नेत्यांनी नागरिकांना अशा प्रकारचे अनधिकृत फ्लेक्स आवडतात हे गृहीत धरू नये.
- ॲड. अमोल काळे, रहिवासी, कोथरूड
कोथरूडमध्ये वाकडे, तिकडे कसेही फ्लेक्स लावण्यात आले आहेत. प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. प्रशासन शांत का आहे? नागरिकांना पदपथावरून चालता येत नाही. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दहीहंडीचे खूप मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावून शासनाचे नियम पायदळी तुडविण्यात आलेत.
- सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद
उत्सव, जयंतीचे संपूर्ण पुणे शहरात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, नागरिकांना कोणतीही इजा पोहचणार नाही याची दखल घेण्यात येते.
- नीलेश घोलप, महापालिका अधिकारी, आकाशचिन्ह परवाना विभाग कोथरूड