पुणे (Pune) : फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे पुणे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण या दोन्ही गावांची तब्बल ३५२.४९ कोटी रुपयांची मिळकतकराची थकबाकी आहे. त्यावर महापालिकेला पाणी सोडावे लागते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान सरकारनेही याबाबत स्पष्टता न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. ११ गावे महापालिका हद्दीत येऊन पाच वर्षे झाल्याने आता तेथून १०० टक्के कर आकारणीला सुरुवात झाली आहे. पण महापालिकेकडून अव्वाच्या सव्वा मिळकतकर घेतला जात असल्याची तक्रार करून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेच्या हद्दीतून बाहेर पडली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर दोन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरु आहे. राज्य सरकारने दिलेल्या या आदेशाच्या विरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना राज्य सरकारने बुधवारी (ता. ११) काढली.
तीन पट दंडाचे काय?
महापालिकेच्या मिळकतकर आकारणीला विरोध असल्याने फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांनी महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण येथून नियमीत करभरणाही कमी प्रमाण होता. तसेच अनधिकृत शेड, अवैध बांधकामांना तीन पट दंड केला आहे. हा दंड आकारणीस स्थगिती असली तरी त्याबाबतचा निर्णय फुरसुंगी, उरुळीसह अन्य ३४ गावांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पण राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
२०० कोटींपेक्षा जास्त विकासकामे
फुरसुंगी, उरुळी देवाची या दोन्ही गावांत कचरा डेपो असल्याने महापालिकेत येण्यापूर्वीपासूनच येथे विकासकामे केली जात आहेत. महापालिकेचा ११ गावांसाठी ३९२ कोटी रुपयांचा सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरु असून, त्यामध्ये या दोन्ही गावांचाही समावेश होता. आता ही गावे वगळल्याने या प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, ही गावे महापालिकेच्या हद्दीत आल्यापासून सुमारे २०० कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे झाली असून, त्यातील १३० कोटींची कामे घनकचरा व्यवस्थापन विभागाची आहेत. तसेच या गावात दरवर्षी पाण्याचे टँकर पुरविण्यासाठी १० कोटी रुपये खर्च केली जातात.
मिळकतकराची वसुली, थकबाकीसंदर्भात राज्य सरकारकडून अद्याप अधिसूचना आलेली नाही. सरकारच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- माधव जगताप, उपायुक्त, मिळकतकर विभाग
आकडे बोलतात
१७६६ हेक्टर
- फुरसुंगीचे क्षेत्रफळ
३८,०२४
- एकूण मिळकती
६२.१५ कोटी रुपये
- यंदाची मिळकतकर मागणी
२९.२८ कोटी रुपये
- वसूल झालेला कर
२२१.४३ कोटी रुपये
- गावे समाविष्ट झाल्यापासून थकबाकी
१००
- दररोज टँकरच्या फेऱ्या
१,०१८ हेक्टर
- उरुळी देवाची गावाचे क्षेत्रफळ
७,५३२
- एकूण मिळकती
२१.४९ कोटी रुपये
- यंदाची मिळकतकराची मागणी
२.६० कोटी रुपये
- वसूल झालेला कर
१३२.०६ कोटी रुपये
- गावे समाविष्ट झाल्यापासूनची थकबाकी
९५
- रोजच्या टँकरच्या फेऱ्या