
पुणे (Pune) : बालभारती ते पौडफाटा रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडून वन विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज केला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौडफाटा हे प्रस्तावित काम सुमारे दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासनाने थांबविलेले आहे. या कामाविरोधात नागरी चेतना मंचाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात न्यायालयाने नुकताच निकाल देत ही याचिका फेटाळून लावली आहे. नागरिकांच्या हरकती, सूचना मागवून त्यावर सुनावणी घेणे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेला पर्यावरण अभ्यास केला आहे. महापालिकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावण्यात आली. तसेच रस्ता करताना महापालिकेला आवश्यक वाटल्यास पर्यावरण विभागाची व वन विभागाची परवानगी घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
त्यानुसार महापालिकेने काही तज्ज्ञ सल्लागारांशी चर्चा केली. त्यात महापालिकेला पर्यावरण विभागाकडे पुन्हा परवानगीसाठी अर्ज करण्याची गरज नाही, असा अभिप्राय देण्यात आला आहे. वन विभागाकडून यापूर्वी परवानगी घेतली आहे, तरीही महापालिकेने याबाबत पुन्हा एकदा वन विभागाची परवानगी घ्यावे, असे सल्लागारांनी सांगितले आहे.
बालभारती ते पौडफाटा रस्त्यासाठी पर्यावरण विभागाकडून महापालिकेला यापूर्वीच ना हरकत देण्यात आलेली आहे. वन विभागाची परवानगी महापालिका घेणार असून, त्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख
अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद
बालभारती ते पौडफाटा रस्त्यासाठी २५२ कोटी रुपये खर्च येणार आहे. पण महापालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात केवळ ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. न्यायालयाचा निकाल आला तेव्हा महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले होते, त्यामुळे तरतूद वाढवता आली नाही. रस्त्याचे काम सुरू झाल्यास त्यासाठी वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.