Pune : दोन दिवसांच्या पावसाने महापालिकेच्या कामांची पोलखोल; आयुक्त उतरले रस्त्यावर

Pune Rain
Pune RainTendernama

पुणे (Pune) : पुण्यात गुरुवारी (ता. २८) आणि शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूड, सिंहगड रस्ता भागात दाणादाण उडाली. कोथरूडमध्ये अनेक सोसायट्या, बंगले, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या. यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना विसर्जन मिरवणूक सोडून कोथरूडला जावे लागले. सिंहगड रस्ता परिसरात सलग दोन दिवस पावसाने महापालिकेच्या कामाची पोलखोल केली. रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प झाली.

Pune Rain
नितिन गडकरी म्हणाले, रस्त्यावर खड्डे पडले तर ठेकेदारांना बुलडोजरच्या खाली टाकू

गुरुवारी व शुक्रवारी कात्रज, आंबेगाव, धायरी, नऱ्हे, खडकवासला, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, सूस, बावधन या भागात मोठा पाऊस झाला. कात्रज येथील महामार्गाखालील भुयारी मार्गात पाणी शिरले. सिंहगड रस्त्यावर वडगाव पूल, पाटील रुग्णालय, इनामदार चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. पाटील रुग्णालयात तर कंबरेपर्यंत पाणी साठले होते. अखेर दुभाजक पाडून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी लागली.

Pune Rain
Pune : फिरत्या हौदांबाबत महापालिकेची कठोर भूमिका; GPS नसेल तर...

आयुक्त तातडीने पडले बाहेर

महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे मानाच्या गणपतींचे स्वागत करण्यासाठी टिळक चौकात मंडपात उपस्थित होते. आयुक्तांनी ग्रामदैवत कसबा गणपती, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम या तीन मानाच्या गणपतींचे स्वागत केले. मुसळधार पावसामुळे कोथरूडमध्ये समर्थ रस्त्यावरील मोरया कृपा, मोरेश्‍वर, गंगानगरी १, २, स्नेह म्हाडा सोसायटी, प्रतिज्ञा मंगल कार्यालय परिसरात पाणी शिरल्याची माहिती आयुक्तांना मिळाली. पालकमंत्री पाटील यांनीही महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आयुक्त स्वतः कोथरूडमध्ये रात्री उशिरापर्यंत थांबून पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी यंत्रणेला सूचना देत होते. समर्थ पथावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने महापालिकेचे अधिकारी आले. पण या वेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग खूपच कमकुवत असल्याचा अनुभव आला. त्यात सुधारणा केली नाही तर पुणेकरांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे भाजपचे प्रवक्ते संदीप खेर्डेकर यांनी सांगितले.

Pune Rain
Pune : वर्षभरातच पुलाची पोलखोल; लोखंडी सळया पुन्हा उघड्या झाल्याने अपघाताची शक्यता

आज पुन्हा धोकादायक स्थिती

गुरुवारी पडलेल्या पावसामुळे सिंहगड रस्ता परिसरात पाणीच पाणी झाले. आज दुपारी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. काही वेळातच वडगाव पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली. त्याचप्रमाणे राजयोग सोसायटीच्या चौकातही गुडघाभर पाणी होते. रस्ते समपातळीत नसणे, पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसणे, चेंबरमधील कचरा, माती न काढल्याने सिंहगड रस्त्यावर पाणी साठण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आजच्या पावसानंतर उपायुक्त आशा राऊत यांनी पाहणी करून यंत्रणा कामाला लावली.

मुसळधार पावसामुळे कोथरूड येथे पाणी तुंबल्याची माहिती मिळाल्याने तेथे भेट देऊन काम सुरू केले. स्थिती नियंत्रणात आलेली आहे. पाण्याचा निचरा वेगाने होण्यास सुरुवात झालेली आहे. आवश्‍यक त्या सुधारणा केल्या जाणार आहेत.

- विक्रम कुमार, आयुक्त

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com