Pune : वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 'मिसिंग लिंक'ची सखोल माहिती महापालिकेकडून तयार
पुणे (Pune) : मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरणारे (मिसिंग लिंक) रस्ते व त्यासंदर्भातील सखोल माहिती महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. त्याबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्तांसमोर होणार आहे. त्यानंतर संबंधित रस्त्यांच्या भूसंपादनाच्या प्रश्नाला दिशा मिळण्याची शक्यता आहे.
शहराचे विस्तारीकरण होत असतानाच, वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत एकीकडे सुरू असलेले उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, रस्ता रुंदीकरण अशा पायाभूत सोयीसुविधांच्या कामांमुळे वाहतुकीवर ताण निर्माण होत आहे. त्यातच पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या आणखी बिकट होत असल्याची सद्यःस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस या दोन्ही प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या रस्त्यांचा (मिसिंग लिंक) मार्ग मोकळा करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत कोथरूडमधील चितळे बंधू दुकानाजवळील रस्ता, विमानतळावरील नवीन रस्ता, हडपसरमधील नोबेल रुग्णालयाजवळील रस्ता असे तीन ‘मिसिंग लिंक’ रस्ते शोधून काढत ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. शहरात कोणकोणत्या भागात मिसिंग लिंक रस्ते आहेत, याची महापालिकेच्या पथ विभाग व पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून मागील काही महिन्यांपासून पाहणी सुरू होती. अनेक अडचणींवर मात करत संबंधित रस्ते पाहणी पूर्ण झाली आहे. निवड केलेले रस्ते, रस्त्यांसंबंधीची सविस्तर माहितीचे दृकश्राव्य सादरीकरण तयार करण्यात आले आहे. हे सादरीकरण गुरुवारी (ता. १४) महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर केले जाणार आहे.
मुख्य रस्त्यांना जोडले जाऊ शकणारे रस्ते
- रस्त्यांसंबंधी सखोल माहितीचा पहिल्यांदाच अभ्यास
- काही रस्त्यांसंबंधी अडचणी सोडविण्यासाठी विविध विभागांची मदत
- एकूण रस्ते - ६७८
- रस्त्यांची लांबी - ४६० किलोमीटर
*अशा आहेत प्रशासनापुढील अडचणी
- अनेक जागा खासगी मालकीच्या असल्याने भूसंपादनासाठी अडचण
- जागा मालकांकडून रोख मोबदल्याच्या मागणीचा प्रशासनाला ताप
- भूसंपादनासाठी विविध विभागांकडून सहकार्याची गरज
मिसिंग लिंक रस्त्यांची पाहणी व निवड प्रक्रिया झालेली आहे. त्याचे नकाशे तयार करून त्यासंबंधीचे दृकश्राव्य सादरीकरण महापालिका आयुक्तांसमोर सादर केले जाणार आहे.
-निखिल मिजार, वाहतूक नियोजन, महापालिका.