
पुणे (Pune) : पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या बहुप्रतिक्षित इमारतीच्या उभारणीला आता गती मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी दिली.
मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्याय संकुल इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून एकूण ८६ कोटी २४ लाख ५१ हजार १६६ रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे प्रशासनाने ऑनलाइन टेंडर प्रणालीद्वारे बी-२ नमुन्यातील अटीनुसार पात्र, सक्षम कंत्राटदार, संस्था, कंपनी यांच्याकडून टेंडर मागविल्या आहेत. ई-टेंडर उपलब्ध कालावधी ११ सप्टेंबर २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२३ असा आहे. इच्छुक कंत्राटदारांची टेंडरपूर्व चर्चा बैठक २० सप्टेंबर २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथे होणार आहे.
पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या अद्ययावत इमारतीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहिला होता. शहरातील वकील संघटना आणि विधितज्ज्ञांनी याबाबत शासन दरबारी वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार आमदार लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.
पिंपरी-चिंचवड न्यायालयाची अद्ययावत इमारत उभारावी, असा निर्धार आम्ही ‘व्हीजन-२०२०’ मध्ये केला होता. शहरातील वकील संघटना आणि पक्षकारांच्या दृष्टीने निश्चितच ही समाधानाची बाब आहे. पीडब्ल्यूडी विभागाने टेंडर प्रक्रियेचे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करून इमारतीच्या कामाला सुरूवात करावी. नोव्हेंबर २०२३ मध्ये इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित व्हावे, अशी अपेक्षा आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा मतदारसंघ