Pune Metro : कात्रज ते निगडी प्रवासाचे पुणेकरांचे स्वप्न नेमके कधी पूर्ण होणार?
पुणे (Pune) : स्वारगेट-कात्रज मार्गावर (Swargate Katraj Metro) भूमिगत मेट्रोचे काम सुरू होण्यास टेंडर (Tender) प्रक्रिया पूर्ण होऊन किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागेल.
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे आता बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, बालाजीनगर, चैतन्यनगर, कात्रज परिसरातील सुमारे ३ लाख नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड, रामवाडी आणि कोथरूडला शिवाजीनगरमार्गे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने मंजुरी दिलेला मार्ग स्वारगेट-कात्रज, पिंपरी चिंचवड-स्वारगेट मार्गाला जोडला जाणार आहे.
अशी असेल पुढची वाटचाल
केंद्राने मंजुरी दिल्यामुळे पुणे मेट्रोकडून आता १० दिवसांत टेंडर प्रसिद्ध होतील. त्यानंतर पुढे १५-२० दिवसांत टेंडर उघडून निवड होणाऱ्या कंपनीला काम देण्यात येईल. त्यांच्याकडून काम सुरू करण्याची तयारी होईल. या प्रक्रियेला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. स्वारगेट - कात्रज मेट्रो मार्ग भूमिगत आहे. या मार्गावर सुमारे तीन महिन्यांपूर्वीच भूसर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे लगेचच काम सुरू होणार आहे.
असा होणार वित्तपुरवठा
एकूण खर्च ः २ हजार ९५४ कोटी ५३ लाख
तरतूद ः केंद्र सरकार २० टक्के व राज्य सरकार २० टक्के
उर्वरित ः ६० टक्के कर्जातून उभी करणार
- स्वारगेट ः कात्रज मेट्रो मार्गाची लांबी ः ५. ४६ किलोमीटर
स्थानके ः स्वारगेट, मार्केटयार्ड (सिटीप्राइड थिएटरजवळ), बालाजीनगर (स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ) आणि कात्रज
पुढच्या विस्ताराकडे आता लक्ष
रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या मेट्रोच्या विस्तारीत मार्गांना आता केंद्र सरकारकडून मंजुरी अपेक्षित आहे. त्यासाठी पुणे मेट्रोकडून सध्या पाठपुरावा सुरू आहे. या दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाल्यावर शहरातील प्रमुख रस्त्यांवर खऱ्या अर्थाने मेट्रोची सुविधा नागरिकांना उपलब्ध होईल.
मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. लाइन-१ बी या नावाने ओळखला जाणारा हा विस्तार ५.४६ किमीचा असून, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज उपनगरांना जोडणाऱ्या तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल. फेब्रुवारी २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या महत्त्वपूर्ण विस्तारामुळे पुण्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या विकासालाही आणखी बळ मिळेल.
- चंद्रकांत पाटील, उच्चतंत्र शिक्षण मंत्री
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील उत्तर आणि दक्षिण ही दोन्ही टोके आता मेट्रोने जोडली जाणार आहेत. त्यामुळे निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते कात्रज हा मेट्रो मार्ग प्रवाशांना उपलब्ध होईल. या मार्गावर प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना आता चांगली सुविधा अल्पावधीत मिळेल. केंद्र सरकारने या मार्गाला मंजुरी दिल्यामुळे दोन्ही शहरांत मेट्रोच्या विस्तारीकरणाला आणि सक्षम सार्वजनिक वाहतुकीला गती मिळणार आहे.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, पुणे मेट्रो