
पुणे (Pune) : थकबाकीमुळे वीजजोड (कनेक्शन) कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील सर्व प्रकाराच्या वीजग्राहकांसाठी सुरू केलेल्या ‘अभय योजने’ला ३१ डिसेंबरपर्यंत ‘महावितरण’कडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.
राज्यातील ‘महावितरण’च्या ३१ मार्चपर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत होता. त्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
राज्यातील ६५,४४५ वीजग्राहकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून ८६ कोटी रुपयांचा भरणा झाला असून, त्यांना ४४ कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ करण्यात आला आहे. नागपूर परिमंडळातील ७ हजार ५९२ वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून, हे परिमंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर परिमंडळ (६ हजार १०१ ग्राहक) आणि पुणे परिमंडळ (५ हजार ८९३ ग्राहक) ही परिमंडळे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
असा लाभ घ्या
संबंधित वीजग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. ‘महावितरण’च्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात.
योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीजग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीजजोड घेण्याचीही सुविधा असेल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.